Vedanta Chairman Anil Agarwal's Son Agnivesh Passes Away : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि दुःखद प्रसंगाचा सामना करत आहेत. मुलगा अग्निवेश अग्रवाल याच्या अचानक जाण्याने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत कठीण काळात अनिल अग्रवाल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय पुन्हा एकदा जाहीर केला आहे.
अग्रवाल त्यांच्या कमाईचा 75 टक्क्यांहून अधिक हिस्सा समाजकार्यासाठी दान करणार आहेत. त्यांनी तसा संकल्प जाहीर केलाय. उर्वरित आयुष्य अत्यंत साधेपणाने जगण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून या निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुलाला दिलेले वचन करणार पूर्ण
अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजाला परत देण्याचे वचन मुलगा अग्निवेशला दिले होते. मुलाच्या निधनानंतर त्यांनी हा संकल्प अधिक दृढ केला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, जे काही कमावले आहे ते समाजाचे आहे आणि आता त्यांचे उर्वरित आयुष्य याच उद्देशासाठी समर्पित असेल. मुलाच्या आठवणीत आणि त्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते आता अधिक वेगाने काम करणार आहेत.
तरुण मुलगा गमावल्यानं कोसळला दु:खाचा डोंगर
अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल याचे वयाच्या 49 व्या वर्षी अमेरिकेत उपचारादरम्यान निधन झाले. कार्डियक अरेस्टमुळे त्याची प्राणज्योत मालवली. एका बापासाठी स्वत:च्या तरुण मुलाला गमावणे हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे. अनिल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, ते आणि त्यांच्या पत्नी किरण अग्रवाल या घटनेमुळे पूर्णपणे खचून गेले आहेत.
मात्र, वेदांता समूहात काम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांना आपल्या मुलासारखी वाटते आणि त्यांच्या प्रेमामुळेच त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळत आहे.
( नक्की वाचा : New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल )
भंगार व्यवसायातून उभे केले साम्राज्य
अनिल अग्रवाल यांचा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे. 1954 मध्ये बिहारमधील पाटणा येथे जन्मलेल्या अनिल अग्रवाल यांनी अतिशय कमी वयात वडिलांसोबत भंगाराच्या व्यवसायातून कामाला सुरुवात केली होती. वयाच्या 19 व्या वर्षी ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण जिद्द मोठी होती.
अनेक व्यवसायांत नुकसान सोसूनही त्यांनी हार मानली नाही. 1976 मध्ये त्यांनी वेदांता समूहाची मुहूर्तमेढ रोवली. आज हा समूह धातू, खाणकाम, वीज आणि तेल अशा मोठ्या क्षेत्रांत कार्यरत असून भारत आणि परदेशातही आपली मजबूत पकड राखून आहे.
अग्रवाल कुटुंब आणि वारसदार
अनिल अग्रवाल यांच्या पत्नी किरण अग्रवाल या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याऐवजी पडद्यामागून कुटुंबाला आणि व्यवसायाला साथ देत आल्या आहेत. मुलगा अग्निवेशच्या निधनानंतर आता कन्या प्रिया अग्रवाल कुटुंबाची आणि व्यवसायाची मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. प्रिया अग्रवाल सध्या हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्ष आहेत आणि समूहातील अनेक महत्त्वाचे निर्णय त्या घेत आहेत. अनिल अग्रवाल यांचे भाऊ नवीन अग्रवाल देखील समूहाचे उपाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.
अग्निवेशचा व्यवसायातील सहभाग
अग्निवेश अग्रवाल हे केवळ वारसदार नव्हते, तर ते व्यवसायातही सक्रिय होते. त्यांनी वेदांताची कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या बोर्डावर काम केले होते. तसेच त्यांनी फुजैरा गोल्ड सारखी कंपनी स्वतः स्थापन केली होती. एवढ्या मोठ्या श्रीमंत कुटुंबातून असूनही अग्निवेश यांना साधे जीवन जगायला आवडत असे. त्यांच्या अकाली निधनामुळे उद्योग जगतातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 4.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 35,000 कोटी रुपये होते. मुलाच्या निधनापूर्वीच त्यांनी त्यांची 75 टक्के संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती. मात्र मुलाच्या जाण्यानंतर त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला असून, ही संपत्ती मुलाच्या स्वप्नांनुसार समाजाच्या कल्याणासाठी वापरली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुलाचे स्वप्न आता अनिल अग्रवाल यांचे मिशन
अनिल अग्रवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, त्यांचे आणि त्यांच्या मुलाचे स्वप्न एकच होते. भारताला आत्मनिर्भर बनवणे, देशातील एकही मूल उपाशी झोपू नये, प्रत्येकाला शिक्षण मिळावे, महिलांचे सक्षमीकरण व्हावे आणि तरुणांच्या हाताला काम मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. मुलाशिवाय आयुष्य अपूर्ण असल्याचे सांगतानाच, त्याचे स्वप्न कधीही अपूर्ण राहू देणार नाही, अशी ग्वाही अनिल अग्रवाल यांनी दिली आहे.