Veer Bal Diwas 2025: भारतीय इतिहासामध्ये शौर्य आणि बलिदानाच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, परंतु गुरु गोविंद सिंह यांच्या चिमुकल्या मुलांनी दिलेला लढा हा आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. वयाच्या अवघ्या 7 आणि 9 व्या वर्षी या मुलांनी ज्या धैर्याने मुघल सत्तेचा सामना केला, त्याला तोड नाही. याच महान बलिदानाचा सन्मान म्हणून आज (26 डिसेंबर) देशभर वीर बाल दिवस साजरा केला जात आहे. खालसा पंथाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता मुघलांसमोर न झुकणाऱ्या या वीर पुत्रांची गाथा आजही देशाला अभिमान वाटायला लावणारी आहे.
मुघलांचा होता इस्लाम स्वीकारण्याचा दबाव
मुघल सम्राट औरंगजेब याच्या आदेशानुसार सरहिंदचा नवाब वजीर खान याने गुरु गोविंद सिंह यांच्या धाकट्या मुलांवर म्हणजेच बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रचंड दबाव टाकला होता.
त्यांना अनेक आमिषे दाखवण्यात आली, परंतु या दोन्ही वीर बालकांनी आपला शीख धर्म सोडण्यास स्पष्ट नकार दिला. मुघलांनी त्यांना अमानवीय यातना दिल्या, तरीही हे साहिबजादे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर 1704 मध्ये या दोन्ही निष्पाप बालकांना जिवंत भिंतीत गाडण्याची क्रूर शिक्षा सुनावण्यात आली.
( नक्की वाचा : Gopal Patha : 'Bengal Files'मधील ‘तो' चेहरा; 1946 च्या हिंसाचारात कलकत्ताचे तारणहार ठरलेले ‘गोपाळ पाठा' कोण? )
या संघर्षाची सुरुवात 1704 मध्ये झाली जेव्हा मुघल सैन्याने आनंदपूर साहिबच्या किल्ल्यावर हल्ला केला होता. अतिशय थंडीच्या दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून गुरु गोविंद सिंह यांनी आपल्या कुटुंबासह किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र, सरसा नदी ओलांडताना पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की संपूर्ण कुटुंब एकमेकांपासून विखुरले गेले. गुरु गोविंद सिंह यांचे दोन मोठे मुलगे चमकौरच्या युद्धात शहीद झाले, तर दोन धाकटे मुलगे आपल्या आजी माता गुजरी यांच्यासोबत वेगळे झाले.
विश्वासघातामुळे साहिबजादे आले मुघलांच्या हाती
माता गुजरी आणि दोन्ही छोटे साहिबजादे आपल्या एका स्वयंपाक्यासोबत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी गेले होते. मात्र एका जवळच्या व्यक्तीने केलेल्या फितुरीमुळे ही माहिती मुघल अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. मुघलांनी तातडीने त्यांना अटक करून सरहिंद येथे नेले. तिथे त्यांना अतिशय थंड अशा बुरुजामध्ये कैद करून ठेवले होते. वजीर खानने वारंवार त्यांना धर्म बदलण्यास सांगितले, पण 7 वर्षांच्या फतेह सिंह आणि 9 वर्षांच्या जोरावर सिंह यांनी मृत्यू स्वीकारला पण स्वाभिमान सोडला नाही.
शहादतीची बातमी ऐकून माता गुजरी यांनीही सोडले प्राण
ज्यावेळी या दोन्ही बालकांना भिंतीत जिवंत चिणले जात होते, तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्यांच्या बलिदानाची ही हृदयद्रावक बातमी जेव्हा त्यांची आजी माता गुजरी यांना समजली, तेव्हा त्यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांनीही आपले प्राण त्यागले. एकाच वेळी गुरु परिवारातील तीन सदस्यांनी धर्माच्या रक्षणासाठी दिलेले हे बलिदान मुघल काळातील सर्वात क्रूर घटनांपैकी एक मानले जाते. या साहिबजाद्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठीच दरवर्षी वीर बाल दिवस साजरा केला जातो.
( नक्की वाचा : हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
खालसा पंथाची स्थापना आणि अन्यायाविरुद्धचा लढा
गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये बैसाखीच्या मुहूर्तावर खालसा पंथाची स्थापना केली होती. मुघलांच्या अत्याचारातून सामान्य जनतेचे रक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. त्यांचे चारही मुलगे साहिबजादा अजित सिंह, जुझार सिंह, जोरावर सिंह आणि फतेह सिंह हे या लढ्याचे अविभाज्य भाग होते. आजही या मुलांचे शौर्य केवळ शीख समुदायासाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.