केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. हेलिकॉप्टर पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सेरसी हेलिपॅड येथून श्री केदारनाथ धामच्या दिशेने हे हेलिकॉप्टर निघालं होतं. हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रवासी प्रवास करत होते. अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. क्रिस्टल एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर होतं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
हेलिकॉप्टर पायलटने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र जर इमर्जन्सी लँडिंग करताना आली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती. सुरक्षित लँडिंगमुळे हेलिकॉप्टरमधील प्रवासी आणि आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
व्हिडीओत दिसत आहे की, हेलिकॉप्टर हेलिपॅडवरुन उड्डाण करताच अनियंत्रित झाल्याचं दिसून येत आहे. हेलिकॉप्टर हवेतच सहा वेळा गर गर फिरलं. हेलिकॉप्टरचा पंखा देखील फिरायचा बंद झाला होता. त्यानंतर हेलिपॅडच्या बाजूला असलेल्या दरीत जमिनीवर आदळलं. सुदैवाने हेलिकॉप्टचं कोणतंही नुकसान यामध्ये झालं नाही आणि प्रवासी देखील थोडक्यात बचावले. हेलिपॅडवर उपस्थित लोकांची धावपळ झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
केदारधाममधील व्हीआयपी दर्शन बंद
केदारनाथमध्ये भक्तांची मोठी रीघ लागली आहे. सोमवारी जवळपास 37 हजार भक्ताा बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. आतापर्यंत 3 लाख 20 हजारहून अधिक भक्तांनी दर्शन घेतलं आहे, जो एक विक्रमच आहे. भक्तांची गर्दी पाहता मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र नंतर ते पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. व्हीआयपी दर्शन मात्र बंद करण्यात आलं आहे.