Who is George Soros : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाजपानं देशद्रोहाचा आरोप केलाय. राहुल गांधी, अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस (George Soros ) आणि जागतिक माध्यम संस्था ओसीआरपी (OCRP) हा एक भारतविरोधी खतरनाक त्रिकोण आहे,असा आरोप भाजपा खासदार संबित पात्रा यांनी केला. लोकसभेतही भाजपा खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी या विषयावर राहुल गांधी यांना 10 प्रश्न विचारत खळबळ उडवून दिलीय. राहुल गांधींवर आजवरच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झालेला हा सर्वात मोठा आरोप मानला जातोय. त्यामुळे वादग्रस्त उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचीही पुन्हा चर्चा सुरु झालीय. सोरोस नेमके कोण आहेत? त्यांना भारतविरोधी का मानलं जातं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोरोस यांची पार्श्वभूमी
अमेरिकन उद्योजक म्हणून ओळख असलेल्या जॉर्ज सोरोस यांचा जन्म 1930 साली हंगेरीत झाला. जगातील धनाढ्य व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. माध्यमांमधील वृत्तांनुसार त्यांची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर आहे. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या सोरोस यांनी हंगेरी नाझी सैन्याच्या ताब्यात गेल्यानंतर जीव वाचवण्यासाठी देश सोडला आणि ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. त्यांनी लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतलं.
( नक्की वाचा : राहुल गांधी यांच्यावर सगळ्यात मोठा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ )
जगभरात उपद्रव
जॉर्ज सोरोस 1956 मध्ये अमेरिकेत गेले. तिथं त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला तसंच ते गुंतवणूकदार आहेत. ओपन सोसायटी या संस्थेची त्यांनी स्थापना केलीय. पण या सोसायटीच्या माध्यमातून भारत, अमेरिका तसंच युरोपातील लोकशाही देशांमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अती डाव्या आणि इस्लमी विचारधारेशी सोरोस यांची जवळीक असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. जगभरातील अनक देशांमध्ये निवडणुका प्रभावित करण्यासाठी त्यांनी उघडपणे मोठी फंडिंग केली आहे. या कारणांमुळे अनेक देशांनी त्यांच्यावर बंदी घातलीय. व्यापार आणि समाजसेवेच्या माध्यमातून अनेक देशातील राजकारणात हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
( नक्की वाचा : मंदिर बंद, खाती गोठावली! 'इस्कॉन' वर बांगलादेश सरकारचा इतका राग का आहे? )
'बँक ऑफ इंग्लंड' उद्धवस्त केल्याचा आरोप
जॉर्ज सोरोस यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर 1992 साली 'बँक ऑफ इंग्लंड' उद्धवस्त करुन स्वत: मोठी कमाई केल्याचा आरोप आहे. ब्रिटनला त्या वर्षी 'काळा बुधवार' सहन करावा लागला होता. तर सोरोसनी एक अब्ज डॉलरची कमाई केली होती. ब्रिटीश पौंडच्या शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून त्यांनी ही कमाई केल्याचा आरोप होता.
सोरोस त्यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त देशात सक्रीय आहेत. जॉर्ज बुश यांना पराभूत करण्यासाठी 125 कोटी खर्च करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी ब्रेग्झिट विरोधी अभियानासाठीही चार लाख पाऊंड्स खर्च केले होते. अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ते कडवे विरोधक आहेत. ट्रम्प हे चोर असल्याचं मत सोरोस यांनी व्यक्त केलं होतं.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. जिनपिंग चीनमधील कम्युनिस्ट सरकारची परंपरा नष्ट करुन हुकुमशाह होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक
जॉर्ज सोरोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कडवे विरोधक आहेत. मोदींना भारत हिंदू राष्ट्र करायचा आहे, असा त्यांचा आरोप आहे. भारतामध्ये मुस्लिमांची अवस्था बिकट आहे. भारतामध्ये झालेल्या CAA विरोधी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता. सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सलील शेट्टी हे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
सोरोस यांच्याबद्दल माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार त्यांनी जगभरातील अनेक मीडिया कंपनीत गुंतवणूक केलीय. अमेरिकन मीडियावर लक्ष ठेवणाऱ्या रिसर्च सेंटरच्या दाव्यानुसार सोरोस यांनी 180 पेक्षा जास्त माध्यम संस्थांना आर्थिक मदत केलीय. अमेरिकेतील 30 पेक्षा जास्त माध्यमांमध्ये त्यांची थेट गुंतवणूक आहे. अमेरिकन बेसबॉलमध्ये बेकायदेशीर पद्धतीनं पैसे गुंतवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. स्वत:च्या आईला आत्महत्या करण्यासही त्यांनी मदत केली होती. स्वत: सोरोस यांनीच याचा खुलासा 1994 साली केला होता.