पाकिस्तानसाठी गुप्तहेर म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली हरियाणाची YouTuber ज्योती मल्होत्राला (Jyoti Malhotra) अटक करण्यात आले आहे. ज्योतीच्या अटकेनंतर डॉक्टर ते यूट्यूबर असा प्रवास केलेला नवांकूर चौधरी (Navankur Chaudhary) सध्या चर्चेत आहे. 'यात्री डॉक्टर' (Yatri Doctor) हे त्याचे YouTube चॅनेल चांगलेच लोकप्रिय आहे. कोण आहे नवांकुर चौधरी? त्याचा ज्योती मल्होत्राशी काय संबंध आहे? या सर्व प्रश्नावर त्यानं काय स्पष्टीकरण दिलं आहे? ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत यात्री डॉक्टर नवांकूर चौधरी?
नवांकूर चौधरी हे नोंदणीकृत एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी 2015 मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून पदवीचं शिक्षण मिळवलं आहे. ते मूळचे रोहतक, हरियाणाचे असून त्यांचा जन्म 2 मार्च 1996 रोजी झाला. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यापूर्वी रोहतकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते सध्या दिल्लीत राहतात.
चौधरी यांनी 2017 साली त्यांच्या ट्रॅव्हल पॅशनसाठी वैद्यकीय पेशा सोडला. त्यानंतर ‘यात्री डॉक्टर' नावाचे स्वतःचे YouTube चॅनेल सुरू केले. आज या चॅनेलचे जवळपास 20 लाख सदस्य आहेत. इंस्टाग्रामवर 6.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि त्यांच्या व्हिडिओजना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. प्रवासाची आवड असलेल्या भारतीयांमध्ये त्यांचं चॅनेल चांगलंच लोकप्रिय आहे.
आजपर्यंत त्यांनी 144 देशांना भेट दिली आहे. ते वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रवासाचे अनुभव सतत शेअर करत असतात.
( नक्की वाचा : Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )
यात्री डॉक्टर चर्चेत का?
सोशल मीडिया युझर्सनी नवांकुर पाकिस्तान उच्चायुक्तालयात एका कार्यक्रमाला हजेरी लावतानाचे, बीएसएफ जवानावर टीका करतानाचे आणि कथितरित्या भारताचा चुकीचा नकाशा दाखवतानाचे जुने व्हिडिओ प्रसारित केले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर टीका सुरु झालीय.
आपण फक्त एकदाच पाकिस्तानला भेट दिल्याचं स्पष्टीकरण चौधरी यांनी या संपूर्ण गदारोळानंतर रविवारी दिलं. 'मी पाकिस्तानला फक्त एकदाच भेट दिली आहे. जगातील 197 देशांमध्ये प्रवास करण्याच्या माझ्या ध्येयाचा तो भाग आहे, असं चौधरीनं स्पष्ट केलं.
ज्योती मल्होत्राशी संबंध काय?
ज्योती मल्होत्राशी असलेल्या कनेक्शनवरही चौधरी यांनी स्पष्टीकरण दिलं आह. 'ती एक फॅन म्हणून माझ्याकडे आली होती. त्यापूर्वी माझी आणि तिची वैयक्तिक ओळख नव्हती. आमची फक्त YouTube बद्दल थोडक्यात चर्चा झाली,' असं चौधरी यांनी सांगितलं.
'मला माझ्या भारतीयत्वाचा अभिमान आहे. माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी सशस्त्र दलात सेवा केली आहे, असं सांगत त्यांनी शभक्तीबद्दलच्या कोणत्याही शंकांचे खंडन केले. माझी कोणतीही चौकशी सुरु नाही. आवश्यक असल्यास मी कोणत्याही एजन्सीला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. फॉलोअर्सनी खोट्या गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढू नये, असं आवाहन त्यांनी केलं.