Who was Gopal Patha Mukherjee? : विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाईल्स' चित्रपटामुळे सध्या गोपाल पाठा (Gopal Patha) हे नाव चर्चेत आले आहे. 1946 मधील ‘डायरेक्ट अॅक्शन डे' (Direct Action Day) दरम्यान कलकत्ता शहराला वाचवणारे ‘तारणहार' म्हणून काही लोक त्यांना ओळखतात. मात्र, त्यांच्याच नातवाचा दावा आहे की, चित्रपटात त्यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे.
कोण होते गोपाल पाठा?
गोपाल पाठा यांचे मुळ नाव गोपाल चंद्र मुखर्जी हे होते. त्यांचा जन्म 1913 साली कोलकातामध्ये झाला. पाठा' या बंगाली शब्दाचा अर्थ ‘बकरा' असा होतो. त्यांच्या कुटुंबाचे कॉलेज स्ट्रीटवर मटणाचे दुकान होते, म्हणूनच त्यांना हे नाव पडले. गोपाल पाठा यांची त्यांच्या परिसरात 'बाहुबली' अशी ओळख होती. त्यांच्याकडे एका इशाऱ्यावर वाट्टेल ते करण्यास तयार असलेल्या तरुणांची फौज होती.
1940 च्या दशकापासूनच गोपाल पाठा यांनी कलकत्ता शहराच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्लिम लीगने कलकत्ता शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी याचा सडेतोड मुकाबला केला. त्यांच्या सैनिकांनी लाठ्या, भाले, चाकू आणि बंदुकांच्या मदतीने शहराचे संरक्षण करण्यासाठी भिंतीसारखे काम केले.
( नक्की वाचा : हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
‘डायरेक्ट अॅक्शन डे' आणि बंगालची परिस्थिती
1940 च्या दशकाच्या सुरुवातीला, अनेक स्वातंत्र्यसेनानींना ‘द्विराष्ट्रवाद' ही संकल्पना अटळ वाटू लागली होती. मुस्लीम लीग आणि मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली ‘पाकिस्तान'ची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, देशाचे विभाजन करून नकाशा काढणे हे एक मोठे आव्हान होते, ज्यामुळे जातीय तणाव वाढत होता.
मुस्लीम लीगला त्यांच्या प्रस्तावित ‘पाकिस्तान' च्या लोकसंख्येची आणि आर्थिक परिस्थितीची चिंता होती. तत्कालीन बंगाल प्रांताचा पूर्वेकडील भाग जरी मुस्लिम-बहुल होता, तरी कलकत्ता आणि हावडा यांसारखे औद्योगिक केंद्र पश्चिम भागात होते. त्यामुळेच, मुस्लिम लीगने कलकत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी योजना आखली. जिना यांनी 16 ऑगस्ट 1946 रोजी ‘डायरेक्ट अॅक्शन डे' (प्रत्यक्ष कृति दिवस) जाहीर केला. याच दिवशी कलकत्ता शहरात प्रचंड हिंसाचार उसळला. तत्कालीन बंगालचे पंतप्रधान आणि मुस्लिम लीगचे नेते हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या आदेशानुसार, स्थानिक मशिदींमधून लोकांना भडकवणारी भाषणे दिली गेली. मुस्लिम लीगच्या समर्थकांनी हिंदूंची घरे जाळली, दुकाने लुटली, हत्या आणि बलात्कारही केले.
( नक्की वाचा : Swami Vivekanand : देशभरातून प्रत्येकी 1 रुपया गोळा करुन कसं उभं राहिलं विवेकानंदांचे शिलास्मारक? )
गोपाळ पाठा यांचा प्रतिहल्ला
17 ऑगस्टपासून हिंदूंनीही एकत्र येण्यास सुरुवात केली. गोपाल मुखर्जी हे अशाच एका गटाचे नेतृत्व करत होते. स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय असलेल्या ‘व्यायाम समिती'च्या सदस्यांनीही यात भाग घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन सैनिकांकडून मिळवलेल्या रॉड, चाकू आणि रिव्हॉल्व्हर्सने ते सज्ज होते. बडाबाजार येथील मारवाडी व्यापाऱ्यांनी या प्रतिहल्ल्यासाठी आर्थिक मदत केली. कलकत्ताला पाकिस्तानला जोडण्याचा मुस्लीम लीगचा कट पाठा यांनी ओळखला होता.
त्यामुळेच त्यांनी त्यांच्याकडील लोकांना आदेश दिले, 'एका हत्येच्या बदल्यात तुम्ही 10 हल्लेखोरांना ठार करा,” असे त्यांनी सांगितले होते. पुढील दोन दिवस चाललेल्या हिंसाचारानंतर आपला टिकाव लागणार नाही, ही जाणीव मुस्लीम लीगला झाली. कलकत्ता शहर पाकिस्तानला जोडण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
ब्रिटिश इतिहासकार अँड्र्यू व्हाईटहेड यांनी एका लेखात म्हटले होते की, “कलकत्ता शहरात आग लागली असताना गोपाल पाठा यांनी त्यात रॉकेल टाकण्याचे काम केले.” परंतु, गोपाल पाठांसाठी हे “दुःखितांना मदत करण्याचे कर्तव्य” होते.
गांधीजी आणि गोपाल पाठा
1947 साली, हत्याकांडाला एक वर्ष झाल्यानंतर महात्मा गांधी यांनी कलकत्त्याला भेट दिली. अनेकांनी त्यांच्या शांततेच्या आवाहनामुळे आपली शस्त्रे खाली ठेवली. मात्र, गोपाल पाठांनी याला नकार दिला. “ग्रेट कलकत्ता किलिंगच्या वेळी गांधीजी कुठे होते?” असा प्रश्न विचारत त्यांनी आपले एकही हत्यार सोपवण्यास नकार दिला होता.
मुस्लीम-विरोधी असल्याचा आरोप आणि नातवाचा बचाव
विभाजनातील हिंसाचारात गोपाल मुखर्जी यांची भूमिका वादग्रस्त ठरली. त्यांना 'हिंदूंचे संरक्षक' मानले गेले, मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांना कधीही 'मुस्लीम-द्वेष्टा' मानले नाही. त्यांचे नातू शांतनु मुखर्जी सांगतात की, 1946 च्या दंगलीत त्यांच्या आजोबांनी अनेक मुस्लिम कुटुंबांना वाचवले होते. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांनी आपल्या घराच्या छतावर अनेक मुस्लिमांना आश्रय दिला होता. त्यांनी त्यांच्या 'रफिक चाचा' नावाच्या रिक्षाचालक कुटुंबालाही वाचवले होते, असे त्यांच्या बहिणीने सांगितले. आजही स्थानिक मुस्लिम त्यांच्या कुटुंबाचा आदर करतात, असेही त्यांनी सांगितले.
शांतनु मुखर्जी यांनी चित्रपटातील कथित ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेत आहेत. शांतनु यांनी त्यात चित्रपटाने त्यांच्या आजोबांचे विचार, कृती आणि वैचारिक विश्वास कमी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 'बंगाल फाईल्स' च्या विरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. पण, न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली.
गोपाल मुखर्जींच्या स्वतःच्या शब्दांत, त्यांचे उद्दिष्ट शहराला वाचवणे होते, निरर्थक हत्या करणे नव्हते. 1997 मध्ये बीबीसीच्या अँड्र्यू व्हाईटहेड यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांनी आपल्या मुलांना महिलांवर हात न लावण्याचे कठोर आदेश दिले होते. “इतिहासात रावणाचा विनाश सीतेचे अपहरण केल्यामुळे झाला. त्यामुळे, मी दोन कठोर आदेश दिले होते: लूट करू नका आणि महिलांवर चुकीचा हात उचलू नका,” असे ते म्हणाले होते.
गोपाल मुखर्जी यांचे निधन 205 साली झाले. कलकत्ताला मुस्लीम लीगच्या गुंडांपासून वाचवणाऱ्या पाठा यांच्या कार्याची स्वतंत्र भारतामध्ये फारशी चर्चा झालीच नाही. 'द बंगाल फाईल्स' सिनेमामुळे एका मोठ्या पिढीला त्यांची ओळख झाली आहे.