Kedarnath temple in Delhi : दिल्लीतील बुराडीमध्ये होणाऱ्या 'श्री केदारनाथ धाम' मंदिराला जोरदार विरोध होत आहे. या विषयावर उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी सरकार बॅकफुटवर आलंय. केदारनाथच्या प्रतिकात्मक मंदिराचं पुष्कप सिंह यांनी केलेल्या शिलान्यासाला अनेक पुरोहितांनी विरोध केलाय. हा मुद्दा जोर पकडतोय हे लक्षात येताच काँग्रेसनंही सत्तारुढ भाजपावर हल्ला केलाय. केदारनाथच्या पायऱ्यांवर पुरोहित या निर्णयाचा विरोध करत आहेत. तर रस्त्यावरही या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी होत आहे.
केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी शिवशंकर लिंग यांनी सांगितलं की, 'हे पुरातन मंदिर आहे. या मंदिराची अखंडता आणि महत्त्व टिकलं पाहिजे. भगवान केदारनाथ त्यांना सुद्बुद्धी देवो आणि त्यांचं कल्याण करो. या मंदिराच्या दिव्यतेला कोणत्याही धार्मिक कारणासाठी खराब करु नका. त्याचं महत्त्व कायम ठेवा'
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंदू परंपरेला धक्का लावण्याचा प्रयत्न
केदारानाथ धामचे तीर्थ पुरोहित संतोष त्रिवेदी यांनी हिंदू परंपरेशी छेडछाड करण्याचा हा प्रयत्न असून हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा दिलाय. हा निर्णय सरकारनं तातडीनं परत घ्यावा. अन्यथा देशात मोठं आंदोलन होईल. हा हिंदूची श्रद्धेसोबतच सनातन आणि वैदिक परंपरेचा अपमान आहे.' असं त्रिवेदी यांनी सांगितलं.
गेल्या बुधवारी दिल्लीतील भगवान केदारनाथाच्या प्रतिकात्मक मंदिर निर्माणाचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी या मंदिाराचा शिलान्यास केला आहे. त्यानंतर केदारनाथ परिसरातील नागरिक आणि तेथील पंडा समाज या निर्णयावर नाराज आहे.
( नक्की वाचा : Lord Jagannath Temple : 1978 नंतर पहिल्यांदाच जगन्नाथाचं रत्नभांडार उघडलं, किती सोनं आढळलं? )
बद्रिनाथ केदारनाथ मंदिर समितीचे माजी अध्यक्ष गणेश गोदियाल यांनीही या निर्णयाला विरोध केलाय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी दिल्लीमधील शिलान्यास कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम होणार आहेत. आमच्या धार्मिक मान्यता, भविष्यातील आशा तसंच विभागातील आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.