संसदेनं मंजूर केलेल्या वक्फ संशोधन विधेयकाला पश्चिम बंगालमध्ये विरोध होत आहे. या विरोधाला राज्यात हिंसक वळण (Murshidabad Violence) मिळालं. भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी या दंगलीबाबत गंभीर आरोप केला आहे. काही जणांना या विधेयकावर राग आहे तर गरिबांना लक्ष्य का केलं जातंय? असा प्रश्न मिथुन यांनी NDTV नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केलाय. त्याचबरोबर ही दंगल का होतीय याबाबतही त्यांनी मोठा दावा केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातील नेहमीचे प्रकार
राज्यात होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना या नव्या नाहीत. इथं रोज काही तरी होतं, असा दावा मिथुन यांनी केला. त्यांनी मीडियावर सर्व घटनांना कव्हरेज देत नसल्याचा आरोप केला. वक्फ संशोधन विधेयकावर होत असलेला विरोध हा अतिशय दु:खद आहे. काही जणांचा या कायद्यावर राग आहे तर गरिबांना लक्ष्य का केले जात आहे? गरिबांना या विधेयकाशी काय देणं-घेणं आहे, असा प्रश्न मिथुन यांनी विचारला.
... म्हणून दंगल घडवली जात आहे
वक्फ विधेयक हे मुस्लिमांसाठी आहे. बहुतांश मुस्लिम महिलांच्या हितासाठी हे बनवण्यात आले आहे, असं भाजपा नेत्यानं स्पष्ट केलं. वक्फच्या जमिनीचा गैरवापर किती जणांनी केला हे या विधेयकातून उघड होईल. अनेकांनी ही जमीन ताब्यात घेऊन भाड्यानं दिली आहे. ते या जागेचं भाडं उकळत आरामात खात आहेत. हा पैसा गरीब मुस्लिमांना द्यावा.
( नक्की वाचा : Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा कायद्यावर RSS मैदानात, मुस्लीम समाजाची करणार जागृती )
काही लोकांनी अनेक एकर जमीन बळकावलीय. त्यांच्यावर बांधकाम केलं आहे. हे सर्व जमिनदोस्त होईल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे ही दंगल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही हे होऊ देणार नाही, असं सांगत दंगेखोरांना चिथावणी दिली जात आहे, असा दावाही मिथुन यांनी केला.
वक्फच्या जमिनींमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. तो बाहेर आला तर अनेकांचा पर्दाफाश होईल, असंही मिथुन यांनी सांगितलं. ज्या लोकांनी याचा फायदा उचललाय ते जगासमोर यावेत अशी तुमची इच्छा नाही का? असा प्रश्न त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव न घेता विचारला.