लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube नं क्लिकबेट म्हणजेच खोडसाळ थंबनेल किंवा शीर्षक देणाऱ्या व्हिडिओच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. या कारवाईची सुरुवात भारतामधून केली जाईल. त्यासाठी विशेषत: ब्रेकिंग न्यूज, चालू घडामोडींबाबतच्या व्हिडिओवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यूट्यूबनं सांगितलं की, प्रेक्षकांचा कंटेटबाबत गोंधळ उडू नये हे निश्चित करणे आमचा उद्देश आहे. त्यामुळेच खोडसाळ थंबनेल देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं यूट्यूबनं त्यांच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय. चुकीच्या थंबनेलचं उदाहरण देखील यूट्यूबनं दिलंय. कंपनीनं 'टॉप पॉलिटीकल न्यूज' हे थंबनील असलेल्या व्हिडिओचं उदाहरण दिलंय. त्यामध्ये न्यूज म्हणजेच बातमीच नाही.
कंपनीनं सांगितलं की, या प्रकारानं प्रेक्षकांना निराशा तसंच फसवणूक झाल्याची भावना सहन करावी लागते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कंपनीनं नियमांचं उल्लंघन करणारा कंटेट हटवणार आहे. पुढील काही महिन्यांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. मुंबईतील एका कोर्टानं नोव्हेंबरमध्ये गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना एक मानहानीकारक व्हिडिओ हटवण्यात अपयश आल्याबद्दल नोटीस दिली आहे. अन्य काही देशांमध्येही या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
( नक्की वाचा : ज्येष्ठ नागरिकाला ताटकळत ठेवल्याचं पाहून भडकला बॉस, कर्मचाऱ्यांना दिली जन्मभर लक्षात राहणारी शिक्षा )
काय होते प्रकरण?
न्यायालयाने मार्च 2022 मध्ये "पाखंडी बाबांचे कारनामे" असे शीर्षक असलेला व्हिडिओ काढण्याचे आदेश युट्यूबला दिले होते. मात्र, हा व्हिडीओ यूट्यूबनं काढला नव्हता. त्यामुळे ध्यान फाउंडेशनतर्फे त्यांचे अधिकृत प्रतिनिधी वेदप्रकाश मिश्रा यांच्यातर्फे अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. सदर व्हिडिओतील आरोप खोटे असून हा व्हिडीओ जाणिवपुर्वक प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओमुळे ध्यान फाउंडेशन आणि त्यांचे संस्थापक योगी अश्विनी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (बॅलार्ड पिअर) यांच्यासमोर ध्यान फाउंडेशनने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी गुगलला नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना 3 जानेवारी 2025 पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.