केक खाल्ल्यानं कॅन्सर होतो? सरकारी अहवालातून गंभीर इशारा

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


फक्त वाढदिवसच नाही तर कोणत्याही सेलिब्रेशनसाठी किंवा लहर आली म्हणून केक खाणाऱ्या मंडळीचं प्रमाण मोठं आहे. केक, पेस्ट्री हे पदार्थ तुम्हालाही आवडत असतील आणि तुम्ही ते वारंवार खात असाल तर ही तुमच्यासाठी काळजीची बातमी आहे. बेकरीमध्ये विकण्यात येणाऱ्या काही केकमध्ये कॅन्सर होण्यास कारणीभूत असलेले अंश आढळले आहेत, असा धक्कादायक अहवाल कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं दिला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कर्नाटक सरकारच्या याच विभागानं दोन महिन्यांपपूर्वी रस्त्यावर विक्री केले जाणारे कबाब, मंचूरियन आणि पाणी पुरीमध्ये कार्सिनोजेन्स हे कॅन्सरचे निर्मिती करणारे अंश सापडल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कर्नाटक सरकारनं गंभीर इशारा दिला आहे. 

कर्नाटक सरकारच्या या विभागानं ऑगस्ट महिन्यात शहरातील वेगवेगळ्या बेकरीमधील 235 केकच्या नमुन्यांची पाहणी केली. त्यामधील 223 केक सुरक्षित आढलले. पण, 12 केकमध्ये धोकादायक कृत्रीम रंग आढळले. हे प्रकार सुरक्षित पातळीपेक्षा अधिक वापरले तर कॅन्सरसह मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतात, असं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : पाणीपुरी खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका? नवा स्टडी रिपोर्ट वाचून उडेल झोप )

रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट या लोकप्रिय केकमध्ये हे धोकादायक केमिकल्स अनेकदा वापरले जातात. त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं संबंधित बेकरींना सुरक्षा मानकांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी रेवंत हिमांतसिंगका यांनी NDTV शी बोलताना सांगितलं की, 'मी एखाद्या विशिष्ट केमिकल बोलू इच्छित नाही. सर्वसाधारणपणे यामधील बहुतेक केमिकल्स अगदी कमी प्रमाणात ठीक असतात. पण, ते जास्त झाले तर प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण खात असलेल्या अन्नांमध्ये हे प्रमाण जास्त आहे की नाही त्याबाबत कोणतीही माहिती आपल्याला नसते, ही मुख्य अडचण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केक आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी या केमिकल्सचा अतिरिक्त वापर केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. 

Topics mentioned in this article