Covid 19 cases rise India 2026: गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. देशात सुमारे 350 हून अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक 115 रुग्ण केरळमधील असून कर्नाटकात 64, महाराष्ट्रात 43 आणि कर्नाटकमध्ये काही रुग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील भागलपूर येथे एकाच कुटुंबातील पिता आणि मुलगी कोरोनाबाधित आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हा संसर्ग पुन्हा वाढतोय का आणि ही नव्या लाटेची सुरुवात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना अचानक कसा परत आला?
तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणू देशातून कधीही पूर्णपणे नष्ट झालेला नव्हता. आता तो फ्लू किंवा इतर नेहमीच्या आजारांप्रमाणेच मानवी शरीरात आणि वातावरणात स्थिरावला आहे. हवामानातील बदल आणि इतर श्वसनाशी संबंधित विषाणूंसोबत (इन्फ्लूएंझा) तो अधूनमधून डोके वर काढत आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव म्हणजे संपूर्ण देशात येणारी कोणतीही नवीन मोठी लाट नसून, काही मर्यादित भागांमधील स्थानिक उद्रेक आहे.
सध्याच्या रुग्णांची लक्षणे आणि धोका कोणाला?
कोलकाता येथील फोर्टिस रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. सुभजीत सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉन लाटेसारखीच लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये ताप, घशात खवखव, खोकला आणि अंगात कळ येणे अशा तक्रारी प्रामुख्याने आहेत. लसीकरण आणि आधी झालेल्या संसर्गामुळे बहुतांश लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांना सौम्य त्रास होत आहे. मात्र, बुजुर्ग नागरिक, गरोदर महिला, आणि मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना संसर्गाचा धोका अधिक आहे.
( नक्की वाचा : Dengue vaccine: डेंग्यूचा ताप आता इतिहास जमा होणार? देशाला मिळाली पहिली लस; कशी काम करते? वाचा सविस्तर )
घबरण्याची गरज आहे का?
आरोग्य तज्ज्ञ आणि राज्य सरकारांच्या मते, सध्या घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पूर्वीसारखी ऑक्सिजनची टंचाई किंवा रुग्णालयांवर प्रचंड ताण येण्याची परिस्थिती अजिबात नाही. आंध्र प्रदेशात झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात संबंधित रुग्णांना आधीच इतर गंभीर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विषाणूचा कोणताही नवीन आणि धोकादायक व्हेरियंट आला आहे का, हे तपासण्यासाठी रुग्णांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे (NIV) जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास लगेचच चाचणी करून घ्यावी आणि काही दिवस घरीच आयसोलेट व्हावे. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी किंवा रुग्णालयात जाताना मास्कचा वापर करावा. तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार घ्यावेत. सध्याच्या परिस्थितीत अफवांवर विश्वास न ठेवता योग्य खबरदारी घेणे हाच सर्वात चांगला पर्याय आहे.