Diwali 2025: दिवाळीत लाडू,चकली,करंजीचा फराळ का करावा? आरोग्यशास्त्रात दडलंय उत्तर,वैद्यांनी दिलेली माहिती वाचा

Diwali 2025: दिवाळीमध्ये फराळ करण्यामागील आरोग्यशास्त्र माहितीय का? जाणून घ्या वैद्य विक्रांत जाधव यांनी दिलेली माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
Diwali 2025: दिवाळी फराळाचे आरोग्यशास्त्रानुसार महत्त्व माहितीये का?
Canva

Diwali 2025: धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. भगवान धन्वंतरींची पूजा करण्यामागेही काही विशेष कारणे आहेत. वैद्य विक्रांत जाधव यांनी ही कारणं समजावून सांगितली आहेत. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात येणाऱ्या धनत्रयोदशीला आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस. म्हणून धनत्रयोदशीचे विशेष असे महत्त्व आहे. वैद्य विक्रांत जाधव यांनी धन्वंतरींच्या पूजनाचे आणि आरोग्यशास्त्रानुसार दिवाळीच्या फराळाचे सांगितलेले महत्त्व जाणून घेऊया... 

भगवान धन्वंतरी यांचे पूजन

समुद्र मंथनातून जी 14 रत्ने बाहेर आली, त्यापैकी एक रत्न हे भगवान धन्वंतरी आहेत; असे वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. चार हात असलेले भगवान धन्वंतरी यांच्या एका हातामध्ये अमृत कलश, दुसर्‍या हातात जळू, तिसर्‍या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र आहे. धन्वंतरींना प्रार्थना करताना आपण त्यांनी दिलेल्या वैद्यकीय शास्त्राचा उपयोग सर्वांच्या आरोग्यासाठी व्हावा, अशी इच्छा व्यक्त करतो. जगभरात अनेक ठिकाणी धन्वंतरींचे पूजन केले जाते. या दिवशीचा धणे आणि गुळाचा खास प्रसादही तयार केला जातो. धणे-गुळातील गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. हा काळ आरोग्य आणि धर्म शास्त्राचा उत्तम मेळ दर्शवतो, असेही जाधव यांनी सांगितले. दिवाळीत धन्वंतरींचे पूजन करत असताना  आपणा सर्वांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली जाते.

हेमंत ऋतू आणि फराळाचे शास्त्र

आयुर्वेदात प्रत्येक ऋतूसाठी विशिष्ट दिनचर्या आणि आहार सांगितला आहे. दिवाळीत आपण विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ का करतो? यामागे एक शास्त्रीय कारण आहे. दिवाळीत वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होते आणि थंडावा वाढतो. निसर्ग या काळात शरीराला गोड, तिखट आणि मैद्याचे जड पदार्थ पचवण्याची शक्ती देतो. हाच खरा हेमंत ऋतू असतो आणि या काळात शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण होत असते. या काळात जड पदार्थ सहज पचतात म्हणूनच या काळात फराळ केला पाहिजे, असे वैद्य जाधव यांनी सांगितले.  

आयुर्वेद आणि धर्मशास्त्र हे नेहमी हातात हात घालून चालत आले आहेत. गणपतीनंतर नवरात्र येते तेव्हा आपण उपवास करतो आणि हिवाळ्यामध्ये दिवाळी सण येत असल्याने या काळात जड पदार्थ पचवण्याची शरीराची ताकद वाढते. आहारशास्त्र पाहिले तर 2 हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्येही चकली आणि अनारशांचा उल्लेख आढळतो. हेमंत ऋतूमध्ये सर्वात जास्त व्यायाम केल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे या ऋतूत गोड पदार्थ खाऊन व्यायाम केल्यास शरीराला अपाय होत नाहीत, असे वैद्य जाधव यांनी सांगितले. या काळात दिवसभर गरम पाणी घेतल्यास वाताचा त्रास कमी करता येतो, असा सल्लाही त्यांनी दिला.

Advertisement

(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला क्रेडिट किंवा डेबिट कार्डची पूजा केलेली चालते का? प्रदोषकाळातील पूजेचे महत्त्व जाणून घ्या)

धन्वंतरी याग आणि वनस्पतींचे महत्त्व

वैद्य जाधव यांनी धन्वंतरी यागाबद्दलही माहिती दिली. या यागामध्ये काही ठराविक वनस्पतींचे हवन केले जाते. या हवनाचे भस्म रुग्णांसाठी वापरले जाते, ज्याचा चांगला उपयोग होतो. अनेक वनस्पती अशा आहेत, ज्यांची नावे लॅटिनमध्ये शोधणेही कठीण आहे, मात्र त्यांचा समावेश आयुर्वेदात पूर्वीच केलेला आहे. सध्याच्या काळात आले, वेलची आणि दालचिनीचा वापर जास्त केला पाहिजे, असा सल्ला वैद्य विक्रांत जाधव यांनी दिला.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)