How to check gas cylinder level: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट अधिक गडद झाले असून, त्याचे थेट चटके आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने घरगुती गॅस मिळणे कठीण झाले आहे.
देशभरात या परिस्थितीमुळे चिंतेचे वातावरण असून, सिलिंडर कधी संपेल आणि नवीन कधी मिळेल, याची धाकधूक प्रत्येकाच्या मनात आहे. अशा बिकट स्थितीत आपल्या घरातील सिलिंडरमध्ये नेमका किती गॅस शिल्लक आहे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे, जेणेकरून ऐनवेळी होणारी ओढाताण टाळता येईल.
गॅसची पातळी ओळखण्याची सोपी पद्धत
तुमच्या घरातील सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे ओळखण्यासाठी 'ओल्या कापडाची ट्रिक' सर्वात प्रभावी आणि सोपी मानली जाते. यासाठी एक सुती कापड ओले करा आणि त्याने सिलिंडरचा वरपासून खालपर्यंतचा भाग व्यवस्थित पुसून घ्या. काही सेकंदानंतर नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला दिसेल की, सिलिंडरचा वरचा काही भाग लवकर सुकला आहे, तर खालचा काही भाग अजूनही ओलाच आहे.
विज्ञानाच्या नियमानुसार, ज्या भागात लिक्विड गॅस भरलेला असतो, तो भाग थंड राहतो आणि तिथे ओलावा टिकून राहतो. याउलट, जो भाग रिकामा आहे, तिथले पाणी हवेमुळे लवकर सुकते. यावरून तुम्हाला गॅस नक्की किती शिल्लक आहे, याचा अचूक अंदाज येईल.
( नक्की वाचा : India Pakistan War: 'रेशन भरून ठेवा, कारण आता पाकिस्तानची बारी'; महिला ज्योतिष्याने सांगितली युद्धाची तारीख! )
गरम पाण्याच्या मदतीने करा खात्री
तुम्हाला अधिक खात्री करून घ्यायची असेल, तर गरम पाण्याचा वापर करूनही गॅसची पातळी तपासता येते. थोडे गरम पाणी घेऊन त्यात कापड भिजवा आणि सिलिंडरच्या एका बाजूने वरून खाली फिरवा. थोड्या वेळानंतर सिलिंडरच्या त्या भागावर हात लावून स्पर्श करा. जिथे सिलिंडर थंड लागेल, तिथे गॅस शिल्लक आहे असे समजावे. ज्या ठिकाणी सिलिंडर गरम किंवा सामान्य तापमानाचा लागेल, तो भाग रिकामा झाला आहे असे समजावे. या पद्धतीमुळे तुम्हाला गॅस संपत आला आहे की नाही, हे लगेच लक्षात येईल.
वजन आणि ज्योतीच्या रंगावरून मिळणारे संकेत
प्रत्येक सिलिंडरवर त्याचे स्वतःचे (रिकामे) वजन लिहिलेले असते. तुमच्याकडे वजनाचा काटा असेल, तर पूर्ण सिलिंडरचे वजन करून त्यातून रिकामे वजन वजा करा. उरलेले वजन म्हणजेच तुमच्याकडील गॅसचे प्रमाण असेल. याव्यतिरिक्त, शेगडी पेटवल्यावर जर निळी ज्योत अचानक पिवळसर पडू लागली किंवा बर्नरमधून येणारा गॅसचा दाब कमी झाला, तर समजावे की गॅस आता शेवटच्या टप्प्यात आहे. हे संकेत ओळखल्यास तुम्ही वेळेपूर्वीच नवीन सिलिंडरची व्यवस्था करू शकता.
( नक्की वाचा : Baba Vanga: 2026 मध्ये काय होणार? इराणमधील युद्धामुळे बाबा वेंगांचे भयानक भाकीत चर्चेत; बघा काय आहे पूर्ण सत्य )
युद्धजन्य परिस्थितीत गॅस वापराचे नियोजन करा
सध्याच्या युद्धजन्य आणि अनिश्चित परिस्थितीमध्ये गॅसचा जपून वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. गॅस संपल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा, दर 4 ते 5 दिवसांनी या सोप्या ट्रिक्स वापरून साठ्याची तपासणी करत राहा. यामुळे तुम्हाला गॅस कधी संपणार याची पूर्वकल्पना येईल आणि तुम्ही वेळेवर बुकिंग करून संभाव्य अडचण टाळू शकाल. घरच्या घरी करता येणारे हे छोटे प्रयोग सध्याच्या इंधन संकटात तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकतात.