Diwali gold buying tips : दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावरही सोन्याची खरेदी धडाक्यात होण्याची चिन्हे आहेत. सोन्याचा भाव दररोज नवा उच्चांक गाठत असला तरीही, सोने खरेदी करणाऱ्यांच्या उत्साहात कोणतीही घट झालेली नाही. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रमी सोने खरेदी होण्याची शक्यता आहे, कारण दिवाळीच्या अगदी तोंडावर म्हणजेच 14 आणि 15 ऑक्टोबरला पुष्य नक्षत्राचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे.
पुष्य नक्षत्राचा शुभ योग कधी?
यंदा पुष्य नक्षत्राचा योग 14 ऑक्टोबरला दुपारी 11 वाजून 54 मिनिटांनी सुरू होत आहे. हा योग दुसऱ्या दिवशी, 15 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर सोनं खरेदी अत्यंत शुभ मानली जाते.
पुष्य नक्षत्राचे महत्त्व काय?
ज्योतिष शास्त्रानुसार, एकूण 27 नक्षत्रांपैकी 8 व्या स्थानावर पुष्य नक्षत्र येते. या नक्षत्राला अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याला 'नक्षत्रांचा राजा' असेही म्हटले जाते.हे नक्षत्र स्थायी असल्यामुळे या काळात केलेली खरेदी स्थायी आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी मानली जाते.
( नक्की वाचा : Diwali Bonus : दिवाळी बोनसवर Tax लागतो की नाही? अनेकांना माहिती नाही गोष्ट... जाणून घ्या IT Act चा नेमका नियम )
या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आणि अधिष्ठाता बृहस्पती देव आहेत. त्यामुळे या काळात केलेले काम शनीच्या प्रभावामुळे स्थायी स्वरूपात फायदा करून देते आणि बृहस्पती देव समृद्धी प्रदान करतात. या शुभ योगामुळे अनेक जण सोन्याची खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील. 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी असल्याने 14 ते 18 ऑक्टोबरपर्यंत सराफा बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळेल.
सोन्याचे दर गगनाला भिडले!
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 17 हजार 650 रुपये झाला आहे, जो काल 1 लाख 14 हजार 950 रुपये होता. म्हणजेच, एकाच दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 2 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, 24 कॅरेट सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 28 हजार 350 रुपयांचा आकडा गाठला आहे. हाच दर काल 1 लाख 25 हजार 400 रुपये होता. त्यामुळे, 24 कॅरेट सोन्याच्या दरात एकाच दिवसात जवळपास 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
लवकरच 1 लाख 35 हजार रुपये!
सोन्याचे दर सध्या उच्चांक गाठत असले तरी, येणाऱ्या दिवसांमध्ये सोन्याचे भाव 1 लाख 35 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सोनं खरेदी करताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींची घ्या काळजी!
सोन्याचे दर गगनाला भिडले असताना, आपण एवढे पैसे खर्च करून सोने खरेदी करत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपले नुकसान टळेल आणि योग्य शुद्धतेचे सोने तुम्हाला मिळेल.
( नक्की वाचा : Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं? )
1. फक्त 'हॉलमार्क' (Hallmark) असलेलेच दागिने खरेदी करा
भारतीय मानक ब्यूरो (BIS) चा हॉलमार्क सोन्याची शुद्धता निश्चित करतो. हॉलमार्क हे दागिने खरेदीच्या दृष्टीकोनातून सर्वात शुद्ध मानले जाते. सोनं 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि त्यापेक्षा कमी शुद्धतेच्या प्रकारांमध्ये उपलब्ध असते. म्हणून, नेहमी हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करा.
2. 'मेकिंग चार्जेस' वर (Making Charges) बार्गेनिंग करा
सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेसबाबत माहिती असणे आवश्यक आहे. सोन्याच्या दरात मोलभाव करता येत नसला तरीही, मेकिंग चार्जेसमध्ये मोलभाव करता येतो. मेकिंग चार्जेस दागिन्यांच्या एकूण किंमतीच्या 30 टक्क्यांपर्यंत असू शकतात. हे शुल्क कमी करण्यासाठी तुम्ही सोनाराशी चर्चा करू शकता.
3. 'सोने खरेदीचे बिल' (Gold Bill) तपासून घ्या
दागिने घेतल्यानंतर सोनाराकडून दागिन्यांचे योग्य बिल घेणे विसरू नका.बिलावर खरेदी मूल्याची माहिती, दागिन्यांची शुद्धता, त्यांचा दर आणि वजन याची सविस्तर माहिती दिलेली असते. भविष्यात जेव्हा तुम्ही हे सोने विकाल, तेव्हा हे बिल अत्यंत उपयोगी ठरते. अन्यथा, सोनार त्याच्या मनाला येईल त्या भावाने दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
सोन्याची खरेदी करताना या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास, नक्कीच तुमची दिवाळी आनंदाची आणि फायद्याची ठरेल.