Gurupushyamrut Yoga 2024 : कोणतंही शुभ कार्य सुरु करण्यासाठी शुभ मुहुर्त आणि नक्षत्र पाहण्याची साधारण पद्धत आहे. जावळ, गृहप्रवेश, नवा व्यवसाय सुरु करने, वाहन, सोनं आणि संपत्तीच्या खरेदीसाठी किंवा कोणतंही विशेष काम सुरु करण्यासाठीा पुष्य नक्षत्र शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्र हे साधारणपणे दर महिन्यात येते.
ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग असतो. नवीन वस्तू, वाहन, सोनं खरेदी करणे या दिवशी लाभदायक असते, असं शास्त्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. दरवर्षी दोन ते चारवेळाच हा योग येतो. त्यामुळे याला मोठं महत्त्व आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोनं खरेदी का करतात?
भारतीयांच्या आयुष्यात सोन्याला खास महत्त्व आहे. भारतीयांसाठी सोनं हा फक्त दागिना नाही. तर संपत्तीचं मोजमाप करण्याचं एकक आहे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडं हस्तांतरित होणारं ते धन आहे. अडीअडचणीच्या वेळी हमखास कामाला येणारी वस्तू आहे. त्यामुळे सोनं खरेदी ही भारतीयांसाठी एक महत्त्वाची घटना असते. कोणत्याही शुभ मुहूर्ताला सोनं खरेदी करण्यासाठी सराफाच्या दुकानात नेहमीच गर्दी असते.
पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये विशेष महत्त्व आहे. पुष्यचा अर्थ पोषण, ऊर्जा आणि शक्ती प्रदान करणारा असा आहे. हे सर्व नक्षत्रांमध्ये अधिक चांगले मानले जाते. ऋगवेदामध्येही पुष्य नक्षत्राचं वर्णन मंगलदायी असं केलं आहे. ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग हा सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
या दिवशी खरेदी केलेली वस्तू ही अधिक काळ उपयोगी आणि अक्षय फळ देणारी असते, अशी समजूत आहे. त्यामुळेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोनं खरेदी करण्यास प्राधान्य दिलं जातं.
( नक्की वाचा : दिग्गज नेत्यांनी अर्ज भरण्यासाठी निवडला '24 कॅरेट मुहूर्त', एकाच दिवशी का सर्वांची धडपड? )
दिवाळीपूर्वी गुरुपुष्यामृत योग
यावर्षी दिवाळीच्यापूर्वी (24 ऑक्टोबर 2024) गुरुपुष्यामृत योग आला आहे. दिवाळीच्या निमित्तानं सोनं, वाहन, घरं तसंच अन्य गोष्टी खरेदी करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्या काळात देशभरातील सर्व बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. यंदा दिवाळीच्यापूर्वीच गुरुपुष्यामृत योग जुळून आल्यानं त्याला खास महत्त्व आहे. सोन्याचे भाव सातत्यानं वाढत असले तरी या दिवशी सोनं खरेदीचे नवे उच्चांक होण्याची शक्यता आहे. सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त गाठण्यासाठी भारतीय खिसा मोकाळा करण्याची शक्यता आहे.
कधी आहे मुहूर्त?
ऑक्टोबर महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हा 24 तारखेला आहे. 24 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी हा योग सुरु होत आहे. गुरुपुष्य नक्षत्राची समाप्ती शुक्रवार 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबरचा संपूर्ण दिवस हा सोनं खरेदीसाठी शुभ आहे.
स्पष्टीकरण : ही संपूर्ण माहिती सामान्य ज्ञान आणि धार्मिक समजुतींवर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची कोणतीही पृष्टी करत नाही.