अनेकांना रात्री झोपेतून वारंवार लघवीसाठी उठावे लागते. ही केवळ जास्त पाणी प्यायल्यामुळे होणारी साधी गोष्ट असू शकते असे अनेकांना वाटते. परंतु, वैद्यकीय दृष्टिकोनातून या समस्येला'नोक्टूरिया'(Nocturia) असे म्हटले जाते. अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर प्रनल सहारे यांच्या मते, रात्री वारंवार लघवीला होणे हे शरीरात उद्भवणाऱ्या इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे कुणी ही याकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला ही ते देतात. शिवाय यावर काय उपाय आहेत हे ही त्यांनी स्पष्ट केले आहेत.
- 1. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI): मूत्रमार्गात जिवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे सूज आणि जळजळ होते. यामुळे मूत्राशयात जास्त लघवी जमा नसतानाही वारंवार वॉशरूमला जाण्याची भावना निर्माण होते.
- 2. डायबिटीस (मधुमेह): रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास किडनी ही अतिरिक्त साखर शरीराबाहेर काढण्यासाठी अधिक वेगाने काम करते. परिणामी, रुग्णाला सतत तहान लागते. त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण मानले जाते.
- 3. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ (Prostate Enlargement): वय 50 पेक्षा जास्त असलेल्या पुरुषांमध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळते. प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढल्याने ती मूत्रमार्गावर दाब निर्माण करते. ज्यामुळे मूत्राशय एकाच वेळी पूर्ण रिकामे होत नाही.
- 4. ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर (Overactive Bladder): या स्थितीत मूत्राशयात थोडे जरी द्रव जमा झाले तरी मज्जासंस्थेकडून मेंदूला त्वरित लघवीला जाण्याचा संदेश पाठवला जातो.
- 5. किडनीच्या समस्या:किडनीचे कार्य मंदावल्यास शरीरातील पाण्याचे आणि युरिनच्या प्रवाहाचे नियंत्रण बिघडते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी त्रास वाढतो.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
लघवी करताना जळजळ, वेदना होणे, लघवीचा रंग बदलणे किंवा त्यातून रक्त येणे, अचानक वजन कमी होणे आणि पाठीच्या खालील भागात तीव्र वेदना होत असल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते योग्य तो सल्ला देतील त्यानुसार यावर औषध उपचार करावेत. ही समस्या योग्य उपचार घेतल्यानंतर दुरू होवू शकते.