Holi 2025: देशभरात होळीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. 2 दिवसांचा होळीचा उत्सव हा फाल्गून महिन्यातील पौर्णिमेला सुरु होतो. पहिल्या दिवशी होलिका दहन (Holika Dahan) केले जाते. दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग लावून हा उत्सव साजरा होतो. असत्यावर सत्याचा विजय या सणातून साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांची गळाभेट घेऊन होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना रंग लावले जातात. एकत्र येऊन पक्वान्नांचा आनंद घेतला जातो. होळीच्या दरम्यान होलिका दहनाची कथा सांगितले जाते. पण, होळीच्या दिवशी एकमेकांना रंग का लावले जातात? हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रथेला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. या कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रीकृष्ण - राधा
ब्रजभूमीमधील होळी देशभर प्रसिद्ध आहे. नंद नगरीमध्ये होळीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात असे. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण (Shri Krishna) आणि राधा यांनी होळीमध्ये रंग लावण्याच्या पद्धतीला सुरुवात केली.
या कथेनुसार श्रीकृष्ण सावळे होते. तर राधा या गोऱ्या होत्या. मी सावळा का आहे? अशी तक्रार बाल श्रीकृष्ण त्यांच्या आई यशोदा यांना सतत करत असे. यशोदा मैय्यानं तुझ्यासारखाच रंग राधेला लाव. त्यामुळे तुम्ही दोघेही एकसारखे दिसाल असा सल्ला दिला.आईच्या सल्ल्यानं खुश झालेला श्रीकृष्ण त्यांच्या मित्रासह राधाला रंग लावण्यास निघाले. श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांनी राधा आणि गोपीकांसोबत जोरदार रंग खेळले. त्यानंतरच मोठ्या उत्साहानं रंग खेळण्यास सुरुवात झाली. त्याला होळी असं म्हंटलं जाऊ लागलं.
हिरण्यकशप, प्रल्हाद आणि होलिका
होलिका दहनासोबत हिरण्यकश्यप, त्याचा पुत्र प्रल्हाद आणि होलिका यांची कथा जोडलेली आहे. हिरण्यकश्यप हा असुरराजा होता, जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या राज्यात विष्णूभक्तीवर बंदी घातली होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस त्यास अपयश आले. शेवटी त्याने त्याची बहीण होलिकाला प्रल्हादला जाळण्याचा आदेश दिला.
( नक्की वाचा : Holi 2025 : होळीच्या दिवशी भांग असलेली ठंडाई घेतलीय? नशा कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय )
होलिकाला अग्नीपासून संरक्षण करणारा वरदानप्राप्त वस्त्र मिळाले होते. ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा करण्याची परंपरा आहे
श्रीकृष्णानं युधिष्ठिराला सांगितली कथा
होळीची एक कथा श्रीकृष्णानं युधिष्ठाराला सांगितली होती. या कथेनुसार एका गावात असूर नावावची स्त्री राहात होती. असूर गावातील लोकांना मारुन खात असे. संपूर्ण गाव तिच्यापासून त्रस्त होतं. लोकांना त्रासलेलं पाहून वसिष्ठ ऋषींनी असूरला कसं ठार मारायचं हे गावकऱ्यांना सांगितलं.
वसिष्ठ ऋषींचा सल्ला ऐकून गावतील मुलांनी असूरची मातीची मूर्ती बनवली. या मुर्तीच्या चारही बाजूला कडबा, लाकूड, कपडे या गोष्टी ठेवण्यात आल्या. असूरला ही मू्र्ती दिसू नये या पद्धतीनं ठेवण्यात आली. पूजा-अर्चना करुन ही मूर्ती जाळली तर असूर देखील जळून खाक होईल. तसंच झालं. असूर जळून खाक झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी होळीका दहन केलं. आनंदानं नाचत होळी साजरी केली. मिठाई वाटली आणि असूर स्त्रीपासून सुटका केली.
महादेव आणि कामदेव
पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवासोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण, महादेव त्याला तयार नव्हते. माता पार्वतीचा हा पेच सोडवण्यासाठी कामदेवांनी त्यांना मदत करण्याचं ठरवलं. महादेव त्यांच्या तपस्येत तल्लीन झाले होते. कामदेव तिथंे आले. त्यांनी महादेवांची तपस्या भंग करण्यासाठी त्यांच्यावर पुष्प बाण चालवले. त्यावेळी महादेवानं रागानं डोळे उघडले आणि कामदेव आगीमध्ये भस्म झाले. त्यानंतर महादेवांचं लक्ष पार्वतीकडे गेले आणि ते लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर महादेवानं पुन्हा एकदा कामदेवाला जिवंत केलं, असं सांगितलं जातं. त्यानंतरच होळीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला.