Ayushman Vay Vandana : जर तुम्ही 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारत सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी एक खास आरोग्य विमा देत आहे. याला आयुष्मान वय वंदना कार्ड (Ayushman Vay Vandana Card) म्हणतात. ही योजना भारतीय ज्येष्ठांना मोफत आरोग्य सेवा पुरवते. याच आयुष्मान वय वंदना कार्डबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जर तुमचे वय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार घेऊ शकता. कोणताही खर्च न करता सरकारी किंवा सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू शकतात. या योजनेत 27 विशेष क्षेत्रांमध्ये 1,961 वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे. ज्यात वैद्यकीय तपासणी, चाचण्या, आयसीयू उपचार आणि शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे.
कोण करू शकतं अर्ज?
आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय फक्त 70 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. त्यानंतर कोणताही व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकतो. विशेष म्हणजे, हा लाभ सर्वांसाठी आहे. यात उत्पन्न किंवा सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात घेतली जात नाही, कारण ही योजना ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा:
- सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून 'Ayushman' ॲप डाऊनलोड करायचे आहे.
- त्यानंतर लाभार्थी किंवा ऑपरेटर म्हणून लॉगिन करायचे आहे.
- आता तुम्हाला मोबाईल नंबर आणि ऑथेंटिकेशन मेथड यासारखी माहिती भरायची आहे.
- यानंतर, तुम्हाला लाभार्थीचे राज्य आणि आधार कार्डची माहिती भरायची आहे.
- जर नाव आढळले नाही, तर ओटीपीवर आधारित संमतीने eKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- आता तुम्हाला आवश्यक असलेल्या वैयक्तिक माहितीसोबत एक घोषणापत्र (Declaration Form) सादर करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यावर आलेला ओटीपी भरायचा आहे.
- यानंतर, तुम्हाला श्रेणी (Category) आणि पिन कोड यांसारखी माहिती द्यायची आहे.
- आवश्यक असल्यास, कुटुंबातील सदस्यांबद्दल माहिती भरायची आहे.
- पडताळणी (Verify) आणि मंजुरी (Approve) मिळाल्यानंतर, तुम्ही ॲपमधून आयुष्मान वय वंदना कार्ड डाऊनलोड करू शकता.