गोल्ड ईटीएफ: परंपरा आणि आधुनिक गुंतवणुकीचे संयोजन
Gold ETF : गेल्या दशकात गुंतवणुकीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे.नवीन पिढीतील गुंतवणूकदारांसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ)हे पसंतीचे माध्यम म्हणून समोर आले आहेत.जागतिक स्तरावर आणि भारतातही ईटीएफने त्यांच्या साधेपणामुळे,पारदर्शकतेमुळे आणि कमी खर्चिक स्वरूपामुळे मोठी लोकप्रियता मिळवली आहे. भारतातील पॅसिव्ह फंड्सच्या मालमत्तेने 14 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.ज्यामधून कमी खर्चाच्या आणि बाजारपेठेशी निगडीत गुंतवणुकीकडे होत असलेले बदल दिसून येतात.
- ही वाढ खालील घटकांच्या एकत्रित परिणामामुळे होत आहे:
- गुंतवणूकदारांमधील वाढती जागरूकता आणि आर्थिक साक्षरता.
- गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेली सुलभ डिजिटल प्रवेश प्रक्रिया.
- पारदर्शक आणि नियमांवर आधारित गुंतवणूक उत्पादनांना मिळणारी पसंती.
परिणामी,ईटीएफ गुंतवणूकदारांच्या फोलिओमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.ज्यामधून किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि अधिक शिस्तबद्ध गुंतवणुकीकडे होत असलेला बदल दिसून येतो.पोर्टफोलिओ निर्मितीच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये ईटीएफ महत्त्वाची भूमिका बजावतात.हे गुंतवणूकदारांना सक्रियपणे शेअर्सची निवड न करता विविध मालमत्ता वर्गांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक करण्याची संधी देतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते मालमत्ता वाटपाला पाठबळ देतात.जे दीर्घकालीन नफ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक मानले जातात.
पोर्टफोलिओ निर्मितीमध्ये ईटीएफचे प्रमुख फायदे
- विविध क्षेत्रे,थीम्स आणि मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीचे वैविध्य.
- होल्डिंग्स आणि कामगिरीचा मागोवा घेण्यातील पारदर्शकता.
- कमी खर्च,ज्यामुळे दीर्घकालीन चक्रवाढ वाढीचा फायदा मिळतो.
- शेअर बाजारावर खरेदी आणि विक्री करण्याची सुलभता.
नक्की वाचा >> Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेची योग्य तारीख, तिथी, पूजा कधी करावी आणि सोने खरेदीचा मुहूर्त जाणून घ्या
मॅक्रोइकॉनॉमिक (स्थूल आर्थिक)परिस्थितीने या बदलाला अधिक वेग दिला आहे.महागाईचा कल,व्याजदर चक्र, चलनातील चढ-उतार आणि भू-राजकीय घडामोडींनी पोर्टफोलिओमध्ये विविधतेच्या गरजेवर अधिक भर दिला आहे. तसेच,पॅसिव्ह गुंतवणुकीचा वाढता स्वीकार हा गुंतवणूकदारांच्या वर्तणुकीतील बदल दर्शवतो.गुंतवणूकदार आता अल्पकालीन नफ्याच्या मागे धावण्याऐवजी स्थिर व प्रबळ पोर्टफोलिओ तयार करण्याकडे वळत आहेत.या बदलत्या चित्रामध्ये,गोल्ड ईटीएफ प्रभावी पर्याय म्हणून समोर आले आहेत, ज्यामध्ये सोन्याचे पारंपारिक आकर्षण आणि आर्थिक गुंतवणुकीची कार्यक्षमता यांचे संयोजन आहे.
2025 मध्ये भारतातील गोल्ड ईटीएफमध्ये 43000 कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक झाली आहे,त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने जवळपास 1.27 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. गुंतवणूकदारांच्या फोलिओची संख्या 1.2 कोटी खात्यांच्या पुढे गेली आहे.जे किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा आणि वाढता सहभाग अधोरेखित करते.
किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये गोल्ड ईटीएफची लोकप्रियता का वाढत आहे?
- सोन्याची साठवणूक करण्याची भीती किंवा त्याच्या शुद्धतेबद्दलची काळजी न करता सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
- शेअर बाजारावर सहज खरेदी-विक्री करण्याच्या सुविधेमुळे हे अत्यंत तरल मानले जातात.
- घडणावळ किंवा वाहतुकीचा खर्च नाही.
- अगदी कमी किंवा लहान रकमेतूनही गुंतवणुकीला सुरुवात करण्याची सोय असते.
- आर्थिक पोर्टफोलिओमध्ये सुलभ समावेश.
गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याची भूमिका नेहमी धोरणात्मक राहिली आहे.ऐतिहासिकदृष्ट्या,अनिश्चिततेच्या काळात आणि बाजारपेठेतील चढ-उतारांदरम्यान सोन्याने एक संरक्षक कवच (हेज) म्हणून काम केले आहे. ज्यामुळे गुंतवणुकीवरील परतावा स्थिर राहण्यास मदत होते.ईटीएफमधील वाढत्या सहभागातूनही दिसून येते की, भारतातील गोल्ड ईटीएफची एकूण मालमत्ता वाढून जवळपास 67 टनांवर पोहोचली आहे.ज्यामधून वार्षिक आधारावर झालेली प्रबळ वाढ निदर्शनास येते.
सोन्याचा सद्यस्थितीतील कल: अनिश्चिततेवर मात
सोन्याचा भविष्यातील कल हा जागतिक मॅक्रोइकॉनॉमिक (स्थूल आर्थिक) परिस्थितीतील बदलांशी जवळून जोडलेला आहे.भू-राजकीय तणाव,महागाईचा दबाव आणि व्याजदरांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल असलेली अनिश्चितता या गोष्टी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहेत.सोन्याच्या किमतीत वेळोवेळी चढ-उतार पाहायला मिळत असले तरी,एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कायम आहे.विशेषतः 2025 मध्ये भारतातील गोल्ड ईटीएफमध्ये 2 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झालेली मोठी गुंतवणूक बदलत्या वातावरणातही गुंतवणूकदारांची सोन्यामधील टिकून असलेली रुची अधोरेखित करते.
सध्याच्या कलानुसार महत्त्वाचे घटक
सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढत आहे.
जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी होत असल्याने जागतिक किमतींना आधार मिळत आहे.
महागाईमुळे विविध मालमत्ता वर्गांमधील वास्तविक परताव्यावर परिणाम होत आहे.
व्याजदरातील बदलांचा सोन्याच्या अल्पकालीन किमतींवर परिणाम होत आहे.
चलनातील अस्थिरता: विशेषतः अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार सोन्याच्या किमतीवर परिणाम करत आहेत.
पोर्टफोलिओच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास बाजरपेठेतील तणावाच्या काळात सोने स्थिरीकरण करणारे साधन म्हणून काम करत राहते. नजीकच्या काळातील किमतींमधील हालचाली बदलत्या राहू शकतात, तरीही पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे आणि जोखीम व्यवस्थापन करणे यांसाठी सोन्याचे महत्त्व आजही तितकेच आवश्यक आहे.
भविष्याचा विचार करता,पुढील पाच वर्षांसाठी गोल्ड ईटीएफचा कल सकारात्मक दिसत आहे.भारतात बचतीचे वित्तीयकरण वेगाने होत आहे,त्यामुळे गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोन्याकडून आर्थिक स्वरूपातील सोन्याच्या गुंतवणुकीकडे अधिक प्रमाणात वळतील,अशी अपेक्षा आहे.
- या वाढीला आकार देणारे संभाव्य प्रमुख कल:
- घरगुती बचतीचे निरंतर वित्तीयकरण.
- प्रत्यक्ष सोन्याकडून वित्तीय सोन्याकडे होणारे स्थित्यंतर.
- वाढता डिजिटल स्वीकार आणि सुलभ उपलब्धता.
- मालमत्ता वाटपाबाबत वाढती जागरूकता.
- प्रबळ वाढ होऊनही भारतातील एकूण सोन्याच्या साठ्यामध्ये गोल्ड ईटीएफचा वाटा अजूनही तुलनेने कमी आहे,ज्यामधून या क्षेत्रात विस्तारासाठी मोठी संधी असल्याचे दिसून येते.
थोडक्यात सांगायचे तर,गुंतवणूकदारांचा सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून गोल्ड ईटीएफ हा त्या उत्क्रांतीचा भाग आहे.सोन्याचे मूळ मूल्य कायम राखून गोल्ड ईटीएफ सुलभता,पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवते.गुंतवणूकदार शिस्तबद्ध आणि वाटप-आधारित गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारत आहेत,तसतसे गोल्ड ईटीएफ दीर्घकालीन पोर्टफोलिओचा अविभाज्य भाग बनण्यासाठी सज्ज आहेत.
कैलास कुलकर्णी, सीईओ, एचएसबीसी म्युच्युअल फंड