iPhone Price Hike: जर तुम्ही नवीन आयफोन किंवा ॲपलचे इतर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ॲपल कंपनी आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा विचाक करत आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या किमती सतत वाढत आहेत. आतापर्यंत कंपनी या वाढीव किमती ग्राहकांवर लादणे टाळू शकली होती, पण आता परिस्थिती अधिक कठीण होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
आयफोनच्या किंमती वाढणार...
ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची तयारी करत आहे. मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे कंपनीवर दबाव वाढला आहे, ज्यामुळे दरवाढ करणे जवळपास आवश्यक झाले आहे. अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने सुसज्ज असलेल्या डेटा सेंटर्सची मागणी वेगाने वाढली आहे. यामुळे मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, या चिप्सच्या पुरवठ्यासाठी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. मर्यादित पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे चिप्सच्या किमती वाढत आहेत.
कधीपासून वाढणार किमती, काय परिणाम होणार?
सध्या, ऍपलने किमती कधी आणि किती वाढणार आहेत हे जाहीर केलेले नाही. टिम कुक यांनी कोणत्या उत्पादनांवर परिणाम होईल हे देखील स्पष्ट केले नाही. तथापि, असे मानले जाते की आयफोनसह इतर ऍपल उत्पादनांवरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. मुलाखतीदरम्यान, टिम कुक यांनी असेही सांगितले की ते सप्टेंबरमध्ये सीईओ पद जॉन टर्नस यांच्याकडे सोपवतील. तथापि, त्यांनी कंपनीच्या संभाव्य दरवाढीबाबत कोणतीही कालमर्यादा किंवा उत्पादनांची यादी दिली नाही.
ऍपलच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीनंतर, रॉयटर्सनेही या विषयावर ऍपलकडून प्रतिसाद मागितला, परंतु कोणताही तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही. आता, ऍपलचे ग्राहक दरवाढीबाबत आणि ती कधी होणार याबाबत कंपनीच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.