Maharashtra Day 2026: मराठी मनाचा स्वाभिमान आणि अस्मितेचा सोहळा असलेला महाराष्ट्र दिन दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका राज्याचा वर्धापन दिन नसून तो शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि प्रदीर्घ लढ्यातून मिळालेल्या विजयाचा गौरव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि मराठ्यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही भूमी आज भारताच्या नकाशावर आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. मात्र हे वैभवशाली महाराष्ट्र राज्य सहजासहजी मिळालेले नाही, त्यामागे एक मोठा आणि संघर्षमय इतिहास दडला आहे जो प्रत्येक मराठी माणसाने जाणून घेणे आवश्यक आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि राज्याची निर्मिती
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर देशात भाषेच्या आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेची मागणी जोर धरू लागली होती. त्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही प्रदेश द्विभाषिक बॉम्बे स्टेटचा भाग होते. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र हवा या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती, तर गुजराती भाषिकांसाठी स्वतंत्र राज्यासाठी महागुजरात आंदोलन सुरू झाले होते.
या आंदोलनांनी इतके उग्र रूप धारण केले की तत्कालीन केंद्र सरकारला या मागण्यांची दखल घेणे भाग पडले. अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्याच दिवशी गुजरात हे वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले
मुंबईसाठी ऐतिहासिक संघर्ष
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये मुंबई हा सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरला होता. मुंबईवर आपला हक्क सांगताना महाराष्ट्रातील लोकांचे म्हणणे होते की येथे बहुसंख्य लोक मराठी बोलतात, त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचीच आहे.
दुसरीकडे, गुजरातच्या लोकांचा असा दावा होता की मुंबईच्या प्रगतीमध्ये आणि आर्थिक विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे मुंबई गुजरातचा भाग असावी किंवा ती केंद्रशासित करावी. या संघर्षात केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्तावही मांडला होता, ज्याला महाराष्ट्रातून तीव्र विरोध झाला. अखेर मराठी माणसाच्या रेट्यापुढे सरकारला नमते घ्यावे लागले आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित झाली.
राज्य पुनर्रचना आयोग आणि जनआंदोलन
राज्यांच्या निर्मितीसाठी डिसेंबर 1953 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची (SRC) नियुक्ती केली होती. या आयोगाने 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला, पण त्यात बॉम्बे स्टेट हे द्विभाषिकच राहावे अशी शिफारस केली होती.
या शिफारसीमुळे मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषिकांमध्ये असंतोष पसरला. डांग जिल्ह्यावरून सुरू झालेला वाद असो वा मुंबईचा ताबा मिळवण्याची धडपड, या सगळ्यातून जनआंदोलन उभे राहिले. या आंदोलनांमध्ये अनेक आंदोलकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, ज्यांच्या बलिदानामुळे आजचा महाराष्ट्र उभा आहे.