Makar Sankranti 2026: निसर्गाचे चक्र आणि मानवी जीवनाचा उत्साह यांचा अनोखा संगम म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी साधारणपणे 14 जानेवारीला येणारा हा सण केवळ धार्मिक नाही, तर भौगोलिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. थंडीच्या कडाक्यात उबदारपणाची चाहूल देणारा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो.
मकर संक्रांतीचे भौगोलिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
मकर संक्रांतीचा थेट संबंध पृथ्वीचे भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर, सूर्य जेव्हा मकर रेषेवर येतो, तो दिवस 14 जानेवारी असतो. कधीकधी ग्रहांच्या स्थितीमुळे हा सण 13 किंवा 15 जानेवारीलाही येतो, परंतु असे खूप कमी वेळा घडते.
ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या या संक्रमणाला अत्यंत शुभ मानले गेले आहे. वर्षातील 12 राशींमध्ये सूर्याचे संक्रमण होत असते, परंतु मकर राशीतील प्रवेशाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे.
( नक्की वाचा : Makar Sankranti 2026 : आकाशात पतंग आणि मनात नवे संकल्प; मकर संक्रांतीचे महत्त्व सांगणारे मुलांसाठी विशेष भाषण )
स्नान आणि दानाचे विशेष पर्व
मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचा सण म्हटले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. पहाटे उठून तिळाचे उबटन लावून स्नान करण्याची परंपरा आहे.
या दिवशी तीळ, गूळ, खिचडी, फळे आणि कपड्यांचे दान केले जाते. असे मानले जाते की, या दिवशी केलेले दान थेट सूर्यदेवापर्यंत पोहोचते आणि घरातील सुख-समृद्धी वाढते.
( नक्की वाचा : 3000 वाढपी, 100 ट्रॅक्टर्सचा ताफा, लाखो भाविकांचा जनसागर, हिवरा आश्रमातील महापंगतीचे नियोजन पाहून व्हाल थक्क )
तिळगुळाचा गोडवा आणि आरोग्याचे शास्त्र
संक्रांतीच्या काळात थंडीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे असल्याने या दिवशी तिळाचे लाडू किंवा इतर पदार्थ बनवले जातात. एकमेकांना तिळगूळ देऊन 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' असे म्हणत नात्यांमधील कडवटपणा दूर करण्याचा संदेश दिला जातो.
सुवासिनी महिला या दिवशी वाण लुटतात आणि हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून सुहाग साहित्याचे आदान-प्रदान करतात.
भारताच्या विविध प्रांतात उत्सवाचे वेगवेगळे रंग
मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात विविध रूपात साजरा होतो. दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये, हा उत्सव 'पोंगल' म्हणून साजरा केला जातो. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये याला 'संक्रांती' म्हणतात.
पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पिकांच्या स्वागतासाठी 'लोहरी' साजरी केली जाते, तर आसाममध्ये 'बिहू' या नावाने आनंदाचा उत्सव साजरा होतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते, ज्याने आकाश रंगीबेरंगी दिसते.
महाभारतातील संदर्भ आणि आध्यात्मिक महत्त्व
मकर संक्रांतीचा उल्लेख महाभारतातही आढळतो. भीष्म पितामह यांनी आपली देहत्त्याग करण्यासाठी सूर्याच्या उत्तरायणाची प्रतीक्षा केली होती. त्यांनी माघ शुद्ध अष्टमीला आपला देह सोडला होता. त्यामुळे पितरांच्या शांतीसाठी या दिवशी जलांजली आणि तीळ अर्पण करण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. हा काळ साधना आणि सिद्धीसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो, म्हणूनच या काळात गृहप्रवेश, यज्ञ आणि इतर मंगल कार्य केली जातात.