Makar Sankranti 2026 : हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांत हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा केवळ एक धार्मिक सण नसून त्याला मोठे भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या निमित्ताने निसर्गात मोठे बदल घडतात. सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे थंडीचा जोर ओसरू लागतो आणि दिवसाचा कालावधी वाढण्यास सुरुवात होते. मानवी नातेसंबंधांत गोडवा निर्माण करणारा हा सण 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देऊन समाजात एकता आणि स्नेहाची भावना वृद्धिंगत करतो.
मकर संक्रातीनिमित्त शाळेत खास कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचा विस्तार करणारं नमुना भाषण आम्ही देत आहोत. याचा तुम्हाला मोठा उपयोग होईल.
मकर संक्रतीनिमित्त शाळेत करण्यासाठीच्या भाषणाचे 10 प्रमुख मुद्दे ( Makar Sankranti 2026 Speech Key Points)
1. मकर संक्रांतीचा दिवस आणि त्याचे महत्त्व.
2. सूर्याचे मकर राशीत संक्रमण आणि उत्तरायणाची सुरुवात.
3. खगोलशास्त्रीय बदल: दिवसाचा कालावधी वाढणे.
4. तीळ आणि गूळ यांच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे.
5. 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा सामाजिक संदेश.
6. शेती आणि नवीन पिकांचे आगमन: सुगड पूजन.
7. पतंग उडवण्याची परंपरा आणि त्यातील आनंद.
8. दानाचे महत्त्व आणि सण साजरा करण्याची पद्धत.
9. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
10. यशाची उंच भरारी घेण्याची प्रेरणा.
( नक्की वाचा : 3000 वाढपी, 100 ट्रॅक्टर्सचा ताफा, लाखो भाविकांचा जनसागर, हिवरा आश्रमातील महापंगतीचे नियोजन पाहून व्हाल थक्क )
मकर संक्रांतीचे सविस्तर भाषण (Makar Sankranti Speech in Marathi)
मकर संक्रांत हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात. आजपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष कललेला असतो, त्यामुळे आजपासून उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे अधिक काळ पडू लागतात. परिणामी, आजपासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होऊ लागते. हा बदल निसर्गातील नवीन ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.
संक्रांतीच्या काळात थंडीचे प्रमाण जास्त असते. अशा वातावरणात शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे असल्याने ते खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामागे एक सामाजिक संदेशही दडलेला आहे. आपण एकमेकांना तिळगूळ देऊन "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणतो. याचा अर्थ असा की, आपल्यातील सर्व जुने वाद, कटुता आणि राग विसरून आपण सर्वांशी प्रेमाने आणि गोडव्याने वागले पाहिजे. तीळ ज्याप्रमाणे गुळात मिसळून एकजीव होतात, तसेच आपणही समाजात गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे.
हा सण कृषी संस्कृतीशी देखील घट्ट जोडलेला आहे. शेतात नवीन धान्य आलेले असते, त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी सुगड पूजन करतात. आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग आपल्याला आकाशात उंच भरारी घेण्याची प्रेरणा देतात. पतंग ज्याप्रमाणे वाऱ्याचा रोख ओळखून वर जातो, तसेच आपणही संकटांचा सामना करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे. मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला निसर्गाप्रती कृतज्ञ राहण्याची आणि मानवी नात्यात गोडवा जपण्याची शिकवण देतो.
मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला केवळ गोड खाण्याचा संदेश देत नाही, तर तो आपल्या मनातील नकारात्मकतेची संक्रांत करून विचारांमध्ये क्रांती घडवण्याची प्रेरणा देतो. ज्याप्रमाणे सूर्याचे उत्तरायण प्रकाशाकडे वाटचाल करते, त्याचप्रमाणे आपणही अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि आळसाकडून कर्तृत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आकाशात उंच उडणारा पतंग जसा दोरीच्या संयमाने स्थिर राहतो, तसेच आपणही यशाच्या शिखरावर पोहोचताना आपल्या संस्कारांची आणि मूल्यांची दोरी घट्ट धरून ठेवली पाहिजे. या संक्रांतीच्या निमित्ताने आपण आपल्या वाणीत गोडवा, वागण्यात नम्रता आणि मनात सर्वांबद्दल प्रेम जपण्याचा संकल्प करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो/देते आणि माझे दोन शब्द संपवतो/संपवते.
धन्यवाद!