नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा उत्साह आणि भक्तीभावाचा संगम असतो. त्याचा आनंद, सेलिब्रेशन करण्यासाठी देवीच्या मंदिरात जाण्यापासून ते गरबापर्यंतच्या वेगवेगळ्या गोष्टी या काळात लहान-मोठे सर्व जण करत असतात. गरबा किंवा नवरात्री मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चांगले कपडे तर हवेच. आपले कपडे हे अधिक उठावदार आणि वेगळे असावे असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण त्यासाठी बजेटही तितकचं तगडं लागतं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही काळजी आता दूर होणार आहे. नवरात्रीमध्ये मिरवण्यासाठी आता कपडे खरेदी करण्याची गरज नाही. तर मुंबईत हे कपडे भाड्यानं देखील मिळतात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घागरा चोळी, कुडते, जॅकेट ते अगदी ज्वेलरीपर्यंतच्या वेगवेगळ्या गोष्टी नवरात्रीमध्ये आता भाड्यानं मिळतात. घाटकोपर, मुलुंडसह मरीन लाईन स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या दुकानात या सर्व गोष्टी तुम्हाला भाड्यानं मिळू शकतात. नवरात्रीनंतर या वस्तूंचं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावर उपाय म्हणून या वस्तू आता भाड्यानं मिळतात. त्याचा ट्रेंड आता वाढू लागला आहे.
काय आहे भाडं?
चर्नी रोडमधील दुकानात घागरे, चोळी, कुडते, मोदी जॅकेट उपलब्ध आहे. चार दिवसांचे भाडे 2500 रुपये आहे. त्यापेक्षा अधिक दिवस जर हे कपडे भाड्याने वापरायचे असतील तर दिवसाला 400 रुपये याप्रमाणे पुढील चार दिवसांचे 1600 रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय कोणता घागरा घेतला आहे त्यानुसार 5 हजार ते 20हजार डिपॉझिट द्यावं लागेल. घागरा दुकानामध्ये परत केल्यानंतर डिपॉझिटचे पैसे परत मिळतील.
( नक्की वाचा : नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट! )
कोट सेट ट्रेंड
यामध्ये बांधणी , जर्डोसी वर्क , सिंपल प्रिंट असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. भाडे तत्वावर खरेदी करताना यामध्ये कोट सेट नावाचा वेगळा प्रकार देखील ट्रेंडीग आहे..यामध्ये प्लाजो , ब्लाऊज आणि वरती जॅकेट असून प्लाजो आणि ब्लाऊज पूर्ण प्लेन आहेत. तर जॅकेटवर सुंदर हातकाम केलेल्या डिझाईन उपलब्ध आहेत. हा एक हटका ट्रेंड सध्या प्रचलित आहे. यामधील कोट सुटसुटीत असल्याची माहिती मरीन लाईन स्टेशन जवळच्या जैन कलेक्शन दुकानाचे मालक हेमंत जैन यांनी दिली.
ज्वेलरी
घागरा चोळी अधिक उठावदार दिसण्यासाठी घागरा चोळीवर ज्वेलरी ही हवीच. ही ज्वेलरी देखील तुम्हाला भाड्याने मिळू शकते. 500 रुपयांपासून ज्वेलरीची सुरुवात होते. बरेच जण आता भाड्याने खरेदी करण्याकडे अधिक लक्ष देतात कारण हे कपडे विकत घेतल्यावर त्या कार्यक्रमापूरते वापरले जातात. नंतर कपाटात ठेवले जातात. मात्र भाड्याने घेतल्यावर पुढच्या वर्षीसाठी पुन्हा नवीन ट्रेंडनुसार कपडे रेंटवर घेता येतात असं हेमंत जैन यांनी सांगितलं.