Subhash Chandra Bose Jayanti 2026: भारताच्या खऱ्या महानायकाची शौर्यगाथा; शाळेत द्या 'हे' धडाकेबाज भाषण!

Subhash Chandra Bose Jayanti 2026 Speech : 'तुम मुझे खून दो, मी तुम्हे आजादी दूंगा' या मंत्राने संपूर्ण भारताला क्रांतीसाठी सज्ज करणाऱ्या या महान सेनानीची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. हा दिवस आपण 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2026 : संपूर्ण भारताला क्रांतीसाठी सज्ज करणाऱ्या या महान सेनानीची 23 जानेवारी रोजी जयंती आहे
मुंबई:

Subhash Chandra Bose Jayanti 2026 Speech In Marathi : ज्यांच्या नावाच्या घोषणेने ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला आणि ज्यांच्या एका आवाजावर हजारो तरुणांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली, ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. 'तुम मुझे खून दो, मी तुम्हे आजादी दूंगा' या मंत्राने संपूर्ण भारताला क्रांतीसाठी सज्ज करणाऱ्या या महान सेनानीची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. हा दिवस आपण 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करतो. या दिवशी शाळेमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात करण्यासाठी खास भाषण आणि त्याचे मुद्दे आम्ही तुम्हाला देत आहोत. 


नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त भाषणाचे 10 महत्त्वाचे मुद्दे  (  Subhash Chandra Bose Jayanti Speech In Marathi Key Points)

1. प्रभावी प्रस्तावना आणि पराक्रम दिवसाचा गौरव.
2. जन्म, प्राथमिक शिक्षण आणि कौटुंबिक संस्कार.
3. आयसीएस परीक्षेत यश मिळवूनही इंग्रजांची नोकरी नाकारणे.
4. स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभाग आणि काँग्रेसमधील प्रवास.
5. आझाद हिंद फौजेची उभारणी आणि ऐतिहासिक नेतृत्व.
6. 'जय हिंद' आणि 'चलो दिल्ली' या प्रेरणादायी घोषणा.
7. परदेशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेली मुत्सद्दी मांडणी.
8. महिलांना युद्धभूमीवर उतरवून दिलेले 'झाशीची राणी' पथकाचे नेतृत्व.
9. नेताजींच्या जीवनातील शिस्त आणि अदम्य इच्छाशक्ती.
10. तरुणांसाठी संदेश आणि समारोप.

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त सविस्तर भाषण ( Netaji Subhash Chandra Bose 2026 Jayanti Speech In Marathi )

व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे, वंदनीय शिक्षक वर्ग आणि माझ्या देशप्रेमी बालमित्रांनो,

"ज्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान असतो, त्यांनाच स्वातंत्र्याची किंमत कळते," असे ठामपणे सांगणाऱ्या एका महापुरुषाला वंदन करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. आज 23 जानेवारी, म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. संपूर्ण भारत हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो.

( नक्की वाचा : Davos 2026 : दावोस म्हणजे नक्की काय आणि त्याचा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंध काय? वाचा सविस्तर )

नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशामधील कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे एक नामांकित वकील होते. सुभाषचंद्र बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी लंडनला जाऊन आयसीएस (ICS) ही त्या काळातील सर्वात कठीण परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. साहेब बनून ऐष आरामात जगण्याची संधी त्यांच्याकडे होती, पण त्यांच्या हृदयात मातृभूमीच्या स्वातंत्र्याची ओढ होती. "इंग्रजांची चाकरी करून मला देशद्रोही बनायचे नाही," असे म्हणून त्यांनी त्या मोठ्या पदाचा त्याग केला. हा त्यागच त्यांच्यातील महानतेची पहिली पाऊलखूण होती.

भारतात परतल्यावर त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. सुरुवातीला त्यांनी चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. नंतर ते काँग्रेसचे अध्यक्षही झाले. पण नेताजींचे विचार आक्रमक होते. त्यांचे म्हणणे होते की, भिकेने स्वातंत्र्य मिळत नसते, ते संघर्षाने खेचून आणावे लागते. याच विचारातून त्यांनी पुढे 'फॉरवर्ड ब्लॉक'ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा इंग्रज अडचणीत होते, तेव्हा नेताजींनी देशाबाहेर जाऊन शत्रूच्या शत्रूला मित्र बनवण्याची रणनीती आखली.

Advertisement

वेषांतर करून त्यांनी केलेला प्रवास आणि जर्मनी, जपान गाठून उभारलेली 'आझाद हिंद फौज' ही एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांनी सिंगापूरमध्ये 'आरझी हुकुमत-ए-आझाद हिंद' सरकार स्थापन केले. त्यांनी दिलेल्या 'चलो दिल्ली' आणि 'जय हिंद' या घोषणांनी संपूर्ण देशात चैतन्य निर्माण केले. विशेष म्हणजे, त्या काळात त्यांनी महिलांसाठी 'झाशीची राणी रेजीमेंट' तयार करून स्त्रियांच्या सामर्थ्याचा जगाला परिचय करून दिला.

आजच्या काळात जेव्हा आपण आपल्या करिअरचा विचार करतो, तेव्हा नेताजींचा त्याग आपल्याला आठवला पाहिजे. त्यांनी केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी सर्वस्व पणाला लावले. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा" ही त्यांची घोषणा केवळ शब्दांचा खेळ नव्हती, तर ते एक आवाहन होते ज्याने भारतीयांच्या मनातली गुलामीची भीती कायमची संपवली.

Advertisement

शेवटी इतकेच म्हणेन की, नेताजींचे शरीर आज आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या रक्तात धावत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यासारखी शिस्त आणि प्रखर राष्ट्रप्रेम आपल्या अंगी बाणवले, तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

अशा या महापराक्रमी नेताजींना मी पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करतो.

जय हिंद! जय भारत!