- रात्री झोपण्यापूर्वी दात न घासल्यास तोंडातील बॅक्टेरिया रक्तप्रवाहात जातात
- तोंडातील जीवाणूंमुळे होणारी सूज हृदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवून शकते
- हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी दिवसातून किमान तीन वेळा दात घासणे आवश्यक आहे
तोंडाची स्वच्छता किंवा 'ओरल हायजीन' ही केवळ एक साधी सवय नसून ती संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रात्री झोपण्यापूर्वी दात न घासल्यास केवळ दात किडण्याचा धोका नसून, यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा भूलतज्ज्ञ डॉ. कुणाल सूद यांनी दिला आहे. डॉ. सूद यांनी 2023 मधील एका संशोधनाचा संदर्भ देत ही गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने तोंडाची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
ते सांगतात जेव्हा आपण दात घासण्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा तोंडातील बॅक्टेरिया रक्तप्रवाहात प्रवेश करतात. यामुळे शरीरात दाह (Inflammation) निर्माण होतो. ज्याचा थेट परिणाम कालांतराने हृदयाच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. रात्री दात न घासल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, या दाव्याशी त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे रात्री झोपण्या पूर्वी दात घासण्याचा सल्ला ते देतात.
निरोगी हृदयासाठी केवळ दोनदा नव्हे, तर दिवसातून किमान 3 वेळा ब्रश करणे चांगले समजले जाते. शिवाय नियमित डेंटल क्लिनिंग करणे फायदेशीर ठरते. यामुळे हिरड्यांचे आजार आणि दात पडण्याची समस्या कमी होते. हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. डॉक्टरांनी स्पष्ट केले की, तोंडातील अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे जीवाणू रक्तावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो असं ही त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Home Remedies: भूक लागत नाहीये? मग 'हे' 5 घरगुती उपाय करून नक्की पाहा, झटपट वाढेल भूक
जरी दात न घासल्याने थेट हार्ट अटॅक येत नसला, तरी हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांपैकी 'खराब ओरल हेल्थ' हा एक महत्त्वाचा धोका आहे. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दिवसातून किमान 3 वेळा दात घासणे आवश्यक आहे. ज्यांची ओरल हायजीन चांगली असते, त्यांचे हृदय इतरांपेक्षा अधिक मजबूत आणि निरोगी राहते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे आजपासूनच रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय लावा.
महत्त्वाचे मुद्दे:
- बॅक्टेरियांचा धोका: रात्री ब्रश न केल्यास तोंडात वाढणारे बॅक्टेरिया रक्तामध्ये मिसळून सूज निर्माण करतात.
- हृदयविकार: ही सूज कालांतराने हृदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते.
- ब्रश किती वेळा: उत्तम आरोग्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा ब्रश करणे फायदेशीर.