New Car Buying Guide India: भारतामध्ये नवीन कार खरेदी करणे हा पूर्वी अत्यंत साधा आणि सोपा निर्णय असायचा. ग्राहकांसमोर फक्त पेट्रोल की डिझेल, एवढाच पर्याय असायचा आणि त्यानंतर त्यात सीएनजीची भर पडली. मात्र, आता ऑटोमोबाईल मार्केट वेगाने बदलले असून पर्यायांचा जणू पाऊस पडत आहे. एकीकडे इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच EV लोकप्रिय होत आहेत, तर दुसरीकडे E20 सारखी इथेनॉल मिश्रित इंधने देशभरात उपलब्ध केली जात आहेत. त्यातच आता फ्लेक्स-फ्युएल गाड्यांचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशा काळात मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर 'कोणती कार खरेदी करू?' यापेक्षा 'कोणत्या इंधनाचा पर्याय निवडू?' असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही निवडलेले इंधनाचा पर्याय तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला यातील गणित समजून घ्यावे लागेल.
काय आहे हे E20, E80 आणि E100 इंधनाचे गणित?
कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि देशाचे पैसे वाचवण्यासाठी सरकार इथेनॉल मिश्रित इंधनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, E20 इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असते. E80 इंधनामध्ये 80 टक्के इथेनॉल आणि 20 टक्के पेट्रोलचे मिश्रण असते, तर E100 हे पूर्णपणे इथेनॉल इंधन असते, ज्यामध्ये 93 ते 95 टक्के इथेनॉल आणि उर्वरित पेट्रोल किंवा इतर घटक असतात. भारताने E20 इंधनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले असून, आता देशात इथेनॉलचे उत्पादन वाढवून याचा वापर अधिक वाढवण्याची तयारी सुरू आहे.
( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )
इथेनॉल इंधनाचा छुपा फटका आणि मायलेजचे नुकसान
देशासाठी इथेनॉलचा वापर फायदेशीर असला, तरी सामान्य ग्राहकांसाठी याचे गणित थोडे क्लिष्ट आहे. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमध्ये ऊर्जा कमी असते. याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजवर होतो. तज्ज्ञांच्या मते, E20 इंधनामुळे पेट्रोल गाडीचे मायलेज साधारणपणे 7 टक्क्यांनी कमी होते.
तुम्ही E30 किंवा E85 सारखे जास्त इथेनॉल असलेले इंधन वापरले, तर मायलेज आणखी कमी होते. म्हणजेच, कारला समान अंतर कापण्यासाठी जास्त इंधन लागते. त्यामुळे जोपर्यंत पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल इंधनाचे दर कमालीचे कमी होत नाहीत, तोपर्यंत ग्राहकांचे पैसे वाचणार नाहीत. याशिवाय, जुन्या गाड्यांमध्ये जास्त इथेनॉलचे इंधन वापरल्यास इंजिनचे सुटे भाग खराब होण्याचाही धोका असतो.
( नक्की वाचा : Dalda Story : भारतीय किचनवर 90% ताबा असणारा डालडा अचानक गायब का झाला? 'ब्रँड' ते 'बॅड' प्रवासाचं कारण काय? )
फ्लेक्स-फ्युएल वाहने म्हणजे काय ?
सामान्य गाड्यांमध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉल असलेले इंधन वापरता येत नाही. यासाठी फ्लेक्स-फ्युएल व्हेईकल्स म्हणजेच एफएफव्ही तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांचे इंजिन अशा पद्धतीने डिझाइन केलेले असते की, ते पेट्रोल आणि इथेनॉलच्या कोणत्याही मिश्रणावर (उदा. E20 ते E100 पर्यंत) अगदी सहज चालू शकतात.
या गाड्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञान, इथेनॉल सेन्सर्स आणि गंज न लागणारे सुटे भाग वापरावे लागतात, ज्यामुळे या गाड्यांची मूळ किंमत सामान्य गाड्यांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, वॅगनआर कारचे फ्लेक्स-फ्युएल मॉडेल हे तिच्या साध्या पेट्रोल मॉडेलपेक्षा तब्बल 86000 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे सुरुवातीला एवढा जास्त खर्च करून भविष्यात इंधनातून पैसे वाचणार का, हा कळीचा मुद्दा आहे.
फ्लेक्स-फ्युएल कार खरंच तुमचे पैसे वाचवतील?
याचे उत्तर भविष्यातील इंधनाच्या किमतींवर अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, जरी E85 किंवा इथेनॉल इंधन पेट्रोलपेक्षा थोडे स्वस्त मिळत असले, तरी गाडीचे कमी होणारे मायलेज आणि कार खरेदी करताना लागणारा जास्त खर्च पाहता ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा दिसत नाही. तज्ज्ञांच्या मते, जर इथेनॉल इंधन पेट्रोलपेक्षा 20 ते 25 टक्के स्वस्त असेल आणि गाडीचे मायलेज 20 ते 30 टक्क्यांनी कमी होत असेल, तर प्रत्यक्षात काहीच बचत होत नाही. त्यामुळे ग्राहकांनी फक्त इंधनाची किंमत न पाहता प्रति किलोमीटर येणारा प्रत्यक्ष खर्च लक्षात घेतला पाहिजे.
इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी करणे फायदेशीर आहे का?
शहरी भागातील ग्राहकांसाठी ईव्ही हा खरोखरच पैशांची बचत करणारा उत्तम पर्याय ठरत आहे. जर तुम्ही घरीच गाडी चार्ज करत असाल, तर पेट्रोल गाडीच्या तुलनेत वर्षाला साधारणपणे 60000 ते 75000 रुपयांची बचत होऊ शकते. तसेच ईव्हीचा मेंटेनन्स खर्चही खूप कमी असतो.
5 वर्षांच्या कालावधीत पेट्रोल गाडीच्या मेंटेनन्ससाठी 70000 रुपये आणि डिझेलसाठी 85000 रुपये खर्च येतो, तिथे ईव्हीसाठी अवघा 30000 रुपये खर्च येतो. ज्यांचे रोजचे फिरणे 30 ते 50 किलोमीटर निश्चित आहे, त्यांच्यासाठी ईव्ही सर्वोत्तम आहे. मात्र, हायवेवर चार्जिंग स्टेशनची कमी संख्या आणि भविष्यात गाडी विकताना मिळणारी कमी किंमत (रीसेल व्हॅल्यू) हे EV साठी काही अडचणीचे मुद्दे आहेत.
कार खरेदी करताना होणारी सर्वात मोठी चूक
बहुतेक ग्राहक कार खरेदी करताना फक्त शोरूममधील तिची किंमत पाहतात, हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते. तज्ज्ञांच्या मते, कार निवडताना तिचा खरेदीचा खर्च पाहण्याऐवजी 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' म्हणजेच गाडी आपल्याकडे असेपर्यंत इंधन, मेंटेनन्स, इन्शुरन्स आणि रीसेल व्हॅल्यू या सगळ्यावर मिळून किती खर्च होणार आहे, याचा विचार केला पाहिजे.
भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात आगामी काळात पेट्रोल, इथेनॉल, फ्लेक्स-फ्युएल आणि ईव्ही हे सर्व पर्याय एकत्र पाहायला मिळतील. जर तुमचे शहरातील रोजचे फिरणे फिक्स असेल, तर ईव्ही तुमच्यासाठी लाखो रुपयांची बचत करेल. जर तुमच्या भागात चार्जिंग सुविधेचा प्रश्न असेल आणि भविष्यात इथेनॉल खूप स्वस्त झाले, तर फ्लेक्स-फ्युएलचा विचार करता येईल. मात्र, सध्याच्या काळात अनेक ग्राहकांसाठी अजूनही पारंपरिक पेट्रोल कार हाच सर्वात सोयीस्कर आणि व्यावहारिक पर्याय ठरत आहे.