Weight Loss: बाळंतपणानंतर अवघ्या 6 महिन्यात घटवलं 30 किलो वजन! नव्या मातांसाठी हे कितपत सुरक्षित?

स्तनपान करणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही कडक डाएट प्लान करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

डिलीव्हरीनंतर अनेक महिलांचे वजन वाढते. त्यामुळे हे वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न अनेक महिला करत असतात. तसे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असते. नोएडा येथील 32 वर्षांच्या मेघना यांनी अवघ्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे. मेघना या इंजिनिअर आहेत. त्यांनी ही कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या प्रवासाची सुरुवात त्यांच्या मुलीच्या एका प्रश्नाने झाली होती. "आई, तू म्हातारी झाली आहेस का? मला कडेवर घेऊन पायऱ्या का चढू शकत नाहीस? त्यानंतर मेघना यांनी आपले वजन कमी केले. 

मेघना या दोन मुलांच्या आई आहेत. डिलीव्हरीनंतर त्यांचे वजन जवळपास 90 किलो झाले होते. त्यानंतर त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी केली. त्यात कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर आणि थायरॉईडची समस्या त्यांना असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांनी जिम किंवा क्रैश डाएटचा वापर टाळला. त्यांनी केवळ शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारली. सकाळी आवळा-सफरचंदाचा ज्यूस, नाश्त्यात पोहे किंवा दलिया, दुपारी एक पोळी, भाजी अन् ताक आणि संध्याकाळी मखाना असा त्यांचा आहार होता. त्यांनी प्रोसेस्ड फूड पूर्णपणे बंद केले. रात्रीच्या जेवणानंतर दररोज 1 तास चालणे सुरू केले. हे सर्व त्यांच्या पथ्यावर पडले. 

Advertisement

नक्की वाचा - Health tips: तुम्हाला ही रात्री वारंवार लघवी होते? दुर्लक्ष करू नका, कारणं जाणून व्हाल हैराण

मुख्य आहार आणि सवयी:

  • 1. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच जेवण.
  • 2. सात्विक आणि घरगुती संतुलित आहार.
  • 3. रोज 1 तास चालण्याचा व्यायाम.

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
कैलास हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता भट्ट यांच्या मते, मेघना यांची शिस्त कौतुकास्पद आहे. तरी ही पद्धत प्रत्येक नवजात बाळाच्या आईसाठी योग्य नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  डिलिव्हरीनंतर इतक्या वेगाने वजन कमी केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. शिवाय इतक्या जलद गतीने वजन कमी केल्याचे धोके ही सांगितले आहेत. त्यानुसार शरीरात ॲनिमिया आणि आयर्नची कमतरता निर्माण होते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D ची ही घट होते. सतत येणारा थकवा आणि अंगावरचे दूध कमी ही होवू शकते. स्तनपान करणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही कडक डाएट प्लान करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.