Rental Boyfriend Trend Hits India: कॅब बुक करावी किंवा जिमला जाण्यासाठी पर्सनल ट्रेनर शोधावा, अगदी त्याच पद्धतीने आता बाजारात थेट 'बॉयफ्रेंड' बुक करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. ऐकायला हे एखाद्या जपानी नाटकातील कल्पित कथेसारखं वाटेल, पण ही गोष्ट आता भारतातही प्रत्यक्षात घडत आहे. फेसबुक ग्रुप्स, इन्स्टाग्राम पेजेस आणि काही खास ॲप्सच्या माध्यमातून तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड भाड्याने देण्याचा हा अजब व्यवसाय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्यवसाय सध्या मर्यादित असला, तरी सोशल मीडियावर शॉपिंग पार्टनर, मुव्ही पार्टनर आणि अगदी हॉस्पिटलमध्ये सोबत जाणाऱ्या जोडीदारांच्या जाहिराती तासाच्या रेटसहित पाहायला मिळत आहेत.
कशी झाली सुरुवात?
या वेगळ्या व्यवसायाची पाळेमुळे 1990 च्या दशकात जपानमध्ये रुजली. तिथल्या एकाकीपणावर मात करण्यासाठी आणि सामाजिक प्रसंगांमध्ये सोबत देण्यासाठी नातेवाईक किंवा मित्र भाड्याने घेण्याची पद्धत सुरू झाली होती. एखाद्या लग्नाला जायचे असेल, ब्रेकअपनंतर मन मोकळे करायचे असेल किंवा नातेवाईकांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी पार्टनर दाखवायचा असेल, तर जपानी लोक या सेवेचा वापर करत असत.
2010 च्या सुमारास याला 'रेंटल गर्लफ्रेंड' आणि 'रेंटल बॉयफ्रेंड' असे व्यावसायिक रूप मिळाले. टोक्योमध्ये एका तासासाठी 3000 येन ते 6000 येन (जवळपास 1700 रुपये ते 3500 रुपये) मोजावे लागतात.
( नक्की वाचा : महिन्याला 1 लाख रुपये कमावणाऱ्यांनाही शहरात मिळेना घर! रिअल इस्टेट मार्केटमधील नव्या ट्रेंडने वाढवली चिंता )
नियम आणि अटी अतिशय कडक
या सेवेचे स्वरूप पूर्णपणे व्यावसायिक आणि मर्यादित असते. एजन्सी आणि प्लॅटफॉर्म्सचे काही ठराविक नियम असतात, जसे की:
- कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधांना पूर्ण मनाई
- हॉटेलच्या खोलीत जाण्यास बंदी
- निर्जन किंवा एकांत ठिकाणी जाण्यास परवानगी नाही
- रात्रभर एकत्र राहता येत नाही
- ग्राहकाने नेहमी आदरयुक्त वर्तन राखणे बंधनकारक
- सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे वाढली लोकप्रियता
जपानपुरता मर्यादित असलेला हा ट्रेंड युट्युब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरील ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्समुळे जगभर पोहोचला. "मी टोक्योमध्ये बॉयफ्रेंड भाड्याने घेतला" अशा व्हिडिओंचे सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज आले आणि हा एक नवा कंटेंटचा प्रकार बनला.
युट्युबवरील एका क्रिएटर्सने तासाला 100 डॉलर्स (सुमारे 8500 रुपये) देऊन बॉयफ्रेंड भाड्याने घेतल्याचा अनुभव शेअर केला होता. या व्हिडिओंच्या माध्यमातून जगाला या अनोख्या सेवेची माहिती मिळाली आणि हळूहळू हा ट्रेंड भारताच्या सोशल मीडिया टाइमलाइनवर येऊन धडकला.
भारतातील डिजिटल मार्केट आणि प्लॅटफॉर्म्स
भारतात जपानसारखी अधिकृत एजन्सी सिस्टीम नसली, तरी फेसबुक ग्रुप्स आणि काही प्लॅटफॉर्म्सवर तरुण स्वतःला 'रेंटल बॉयफ्रेंड' म्हणून प्रमोट करत आहेत. 'KoPartner' सारख्या साईट्स याला 'प्रोफेशनल सोशल सपोर्ट सर्व्हिसेस' असे नाव देतात.
या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या कामांसाठीचे दर खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत:
- हँग आऊट: 1500 रुपये प्रति तास
- क्लबिंग: 2000 रुपये प्रति तास
- मुव्ही पार्टनर: 2000 रुपये प्रति तास
- शॉपिंग बडी: 2000 रुपये प्रति तास
- मेडिकल सपोर्ट: 2000 रुपये प्रति तास
इन्स्टाग्राम आणि डेटिंग ॲप्सचा वापर
या सेवेसाठी इन्स्टाग्रामवर 'रेंट युअर ओन बॉयफ्रेंड इंडिया' सारखी पेजेस सक्रिय झाली आहेत, ज्यांचे 10000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या पेजेसवर कॉफी डेट, शॉपिंग ट्रिप आणि कार सेल्फीचे आकर्षक फोटो टाकून जाहिरात केली जाते. काही तरुण तर टिंडरसारख्या डेटिंग ॲप्सच्या बायोमध्ये 'पेड कंपनी ओन्ली' किंवा 'अव्हेलेबल फॉर इव्हेंट्स' असे लिहून ग्राहकांचा शोध घेतात. 'RentAFriend' सारख्या आंतरराष्ट्रीय साईट्सवरही अनेक भारतीय तरुणांचे प्रोफाईल्स 11 ते 15 डॉलर्स प्रति तास या दराने उपलब्ध आहेत.
नक्की कोण घेतंय हे प्रोफाईल्स भाड्याने?
हा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये बहुतांश कॉलेजचे विद्यार्थी आणि पार्ट टाईम कमाई करू इच्छिणारे तरुण आहेत. जर एखाद्या तरुणाला 2000 रुपये प्रति तास या दराने महिन्याला केवळ 5 मुव्ही पार्टनरचे बुकिंग मिळाले, तरी त्याची चांगली कमाई होते. दुसरीकडे, या सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शहरातील 20 ते 30 वयोगटातील महिलांचा समावेश आहे. काही महिला केवळ कुतूहल म्हणून किंवा व्हिडिओ कंटेंट बनवण्यासाठी, तर काही जणी खरंच एकटेपणा घालवण्यासाठी या सेवांचा पर्याय निवडत आहेत.
एकटेपणावर मात की केवळ एक व्यवसाय?
शहरांमधील बदलती जीवनशैली, व्यस्त दिनचर्या आणि वाढता एकटेपणा यांमुळे अशा सेवांना मागणी येत आहे. नवीन शहरात गेल्यानंतर हॉटेलात एकटं जेवायला संकोच वाटत असेल, तर सोबत म्हणून अशा पार्टनरला बोलावले जाते. मात्र, या सर्व व्यवहारात वेळेची किंमत मोजावी लागते.
2026 च्या या डिजिटल युगात जिथे 10 मिनिटांत अन्न आणि 5 मिनिटांत कॅब मिळते, तिथे आता सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकणारा माणूसही तासाच्या हिशोबाने बुक करता येऊ लागला आहे. टायमर संपताच हा भाड्याचा पार्टनर निघून जातो, पण बदलत्या जगातील नात्यांच्या स्वरूपावर एक मोठा प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित करतो.