- कार्डियोमायोपैथी या आजारात हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा असामान्य होऊन रक्तपुरवठा प्रभावित होतो
- या आजाराचे मुख्य प्रकार डायलेटेड, हायपरट्रॉफिक आणि रिस्ट्रिक्टिव्ह असून वेळेवर उपचार आवश्यक आहेत
- धाप लागणे, छातीत दुखणे, पाय सूजणे आणि थकवा या लक्षणांवर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे
दारू पिणाऱ्यांचे हृदय मोठे असते, असे गमतीने म्हटले जाते. मात्र असे असले तरी वैद्यकीय शास्त्रात मात्र हे गंभीर संकटाचे लक्षण मानले जाते. या स्थितीला 'कार्डियोमायोपैथी' (Cardiomyopathy) असे म्हणतात. ही एक अशी व्याधी आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा असामान्य होतात. ज्यामुळे शरीराला रक्तपुरवठा करण्यात अडथळे येतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हे हार्ट फेलियर किंवा अचानक मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे.
कार्डियोमायोपैथीमध्ये हृदयाचे स्नायू प्रसरण पावतात. किंवा जाड आणि ताठ होतात. याचे प्रामुख्याने डायलेटेड, हायपरट्रॉफिक आणि रिस्ट्रिक्टिव्ह असे प्रकार पडतात. सुरुवातीला सौम्य वाटणारा हा आजार कालांतराने इतका बळावतो की रुग्णाला हार्ट ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. या आजाराला 'सायलेंट किलर' मानले जाते. कारण अनेकदा सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. धाप लागणे, छातीत दुखणे, पाय किंवा पोटाला सूज येणे आणि थकवा ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
अनुवांशिक कारणांशिवाय जास्त प्रमाणात मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यामुळे हा आजार जडू शकतो. अनेक रुग्ण या आजाराची लक्षणे दुर्लक्षित करतात. जर तुम्हाला चालताना धाप लागत असेल, सतत चक्कर येत असेल किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः ज्यांना 10 वर्षांपेक्षा जास्त काळ मधुमेहाचा त्रास आहे किंवा जे मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात, त्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
अनुवांशिक आजार टाळणे कठीण असले तरी, जीवनशैलीत बदल करून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. मद्यपान आणि ड्रग्जपासून लांब राहणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी ताणतणाव कमी करणे आवश्यक आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला पाय सुजणे किंवा छातीत अस्वस्थ वाटणे असे त्रास जाणवत असतील, तर ईसीजी (ECG) किंवा इको चाचणी करून घेणे हिताचे ठरेल.
धोक्याची घंटा
- अनुवांशिकता: कुटुंबात कोणाला हृदयविकार असल्यास धोका वाढतो.
- व्यसन: अल्कोहोल आणि अमली पदार्थांचे सेवन थेट हृदयावर परिणाम करते.
- इतर आजार: हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी (लठ्ठपणा) आणि कोव्हिडनंतरचे इन्फेक्शन ही देखील याची महत्त्वाची कारणे आहेत.