हिंदू धर्मात शंखाला पूजेचा अविभाज्य भाग मानले जाते. त्यामुळेच प्राचीन काळापासून शंखाचा वापर धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये केला जातो. देवाच्या पूजेत अत्यंत शुभ मानले जाणारे शंख अनेक प्रकारचे असतात. यामध्ये गणेश शंख, दक्षिणावर्ती शंख, वामावर्त शंख, मोती शंख, पांचजन्य शंख, भीम शंख इत्यादींचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया धार्मिक कार्यांमध्ये शंख का वाजवला जातो. शिवाय कोण कोणते शंख वापरले जातात.
पूजेमध्ये शंख का वाजवला जातो?
हिंदू धर्मात शंखाला अत्यंत पवित्र आणि मंगलदायक मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार, पूजा किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये शंख वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. सकारात्मक ऊर्जा पसरते. धर्माचे मंगलदायक प्रतीक मानल्या जाणाऱ्या शंखाच्या आवाजाने वातावरण पवित्र होते. शंखाच्या ध्वनीने देवी-देवतांना जागे करण्याचा प्रयत्न केला जातो. असे मानले जाते की, या मंगलमय ध्वनीमुळे देवता प्रसन्न होऊन इच्छित आशीर्वाद देतात.
श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख
पांचजन्य शंख अत्यंत पवित्र आहे. हिंदू मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांशी संबंधित हा दिव्य शंख ज्या ठिकाणी असतो, तेथे सुख-सौभाग्य कायम राहते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाच्या राक्षसाला मारून हा शंख मिळवला होता. महाभारत युद्धात युद्धाची सुरुवात आणि समाप्ती करण्यासाठी ते त्याच शंखाचा वापर करत होते. हिंदू मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. असे मानले जाते की, रोज लड्डू गोपाळांना दूध, पाणी इत्यादींनी स्नान घातल्यास त्यांची कृपा लवकर प्राप्त होते.
पांडवांच्या शंखांची नावे काय होती?
महाभारत काळात पाच पांडव आणि कौरवांमधील प्रमुख दुर्योधनाकडेही त्यांचे स्वतःचे शंख होते. अर्जुनाकडे देवदत्त नावाचा, तर भीमाकडे पौंड्र शंख होता. पांडवांमधील सर्वात मोठे युधिष्ठिर यांच्याकडे अनंतविजय नावाचा शंख होता. तर नकुलाकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. दुर्योधनाकडे विदारक नावाचा शंख होता, तर कर्णाकडे हिरण्यगर्भ नावाचा शंख होता.
शंखाशी संबंधित काही खास गोष्टी
- शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली. त्यामुळे त्याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते. त्यामुळे, लक्ष्मीची इच्छा असणाऱ्यांनी रोज पूजेमध्ये शंख नक्की वाजवावा आणि त्याची पूजा करावी.
- सनातन परंपरेत दक्षिणावर्ती शंख भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. हा शंख भगवान विष्णूसोबतच देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांच्या हातातही पाहायला मिळतो.
- अपत्यसुखाची इच्छा असणारे लोक आपल्या घरात गणेश शंखाची रोज पूजा करतात. तर दक्षिणावर्ती शंखाचा संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी आहे. असे मानले जाते की, ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो, तेथे देवी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते.
- वास्तुशास्त्रानुसार, शंख नेहमी आपल्या पूजाघरात उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा. या दिशेला ठेवलेला शंख शुभता आणतो.