Water Accident Safety Tips : नुकतच नोएडात एका टेक प्रोफेशनलसोबत घडलेल्या दुर्देवी घटनेमुळं सर्वांना धक्का बसला आहे. या अपघातासारखी परिस्थिती एखाद्यासोबत ओढवली, तर त्यावेळी तातडीनं काय करावे? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. कारण भरधाव कार पाण्यात शिरल्यावर मृत्यूच्या उंबरठ्यावरच पोहोचल्यासारखं वाटतं.अशा परिस्थितीत हृदयाचे ठोकेही वाढलेले असतात. ही परिस्थिती अत्यंत भयानक असते, परंतु योग्य उपायांची माहिती असल्यास जीव वाचू शकतो. अशा वेळी लोक खूप घाबरतात आणि चुकीचे निर्णय घेतात. कोणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो,तर कोणी मदतीची वाट पाहत बसतो.पण सत्य हेच आहे की, अशा घटनेदरम्यान ताकदीचा वापर करण्याऐवजी योग्य पावले उचलणे महत्त्वाचे असते. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
1. सीट बेल्ट काढा
कार पाण्यात पडताच लगेच सीट बेल्ट काढा. संतुलन राखण्यासाठी एक हात स्टियरिंगवर किंवा कारच्या छतावर ठेवा. म्हणजे डोक्याला धक्का बसणार नाही.एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
2. खिडकी उघडा
सीट बेल्ट काढल्यानंतर लगेच बाजूच्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत 30 ते 60 सेकंद पावर विंडो बहुंताश वेळा काम करतात.जर खिडकी उघडली नाही, तर साइड विंडोच्या कोपऱ्यावर जोर देऊन ती फोडण्याचा प्रयत्न करा.
3. पुढची काच (विंडशील्ड) फोडू नका
अशा परिस्थितीत पुढची काच फोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण ती काच खूप मजबूत असते आणि अशा अवस्थेत ती फोडणे जवळपास अशक्य असते.
4. डोके बाहेर काढा
खिडकी उघडताच किंवा फुटताच क्षणाचाही विलंब न करता बाहेर निघा. सर्वप्रथम डोके बाहेर काढा आणि स्वतःला कारपासून दूर ढकला. पाण्यात वर जाणारे बुडबुडे नेहमी वरच्या दिशेने जातात. त्यांचे अनुसरण केल्यास वर जाण्याची दिशा समजते. बुडत असलेल्या कारजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते. कारण का तुम्हालाही तिच्यासोबत खाली ओढू शकते.
5. तुमच्यासोबत मुलं असतील तर काय कराल?
जर कारमध्ये मुलं असतील,तर सर्वप्रथम स्वतःची सीट बेल्ट काढा. म्हणजे तुम्ही मोकळे होऊन त्यांना मदत करू शकाल. त्यानंतर मुलांना त्यांच्या वयाच्या क्रमाने एकामागोमाग एक खिडकीतून बाहेर काढा. स्वतः शेवटी बाहेर पडा. सीट बेल्ट लावलेल्या मुलांनी आधी मदत करण्याचा प्रयत्न केला तर वेळ वाया जाण्याची शक्यता असते.
6. पोहता येत नसेल तर?
बर्याच लोकांना वाटते की पोहता येत नसेल तर वाचणे अशक्य आहे.पण हे खरे नाही. कारमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला पोहायची गरज नसते.फक्त पाण्यावर तरंगून राहावे लागते. डोके मागे वाकवा.हात-पाय थोडेसे पसरवा आणि हळूहळू श्वास घ्या.माणसाचे शरीर नैसर्गिकरीत्या पाण्यावर तरंगू शकते. फक्त शांत राहणे आवश्यक आहे. अनेकदा भीतीमुळे माणूस बुडण्याची शक्यता असते.
नोट (महत्त्वाचे):
जेव्हा कार पाण्यात पडते तेव्हा ती लगेच बुडत नाही.सामान्यतः काही सेकंद,कधी कधी एक मिनिटपर्यंत ती पाण्यावर तरंगत राहते.या दरम्यान कारच्या आत आणि बाहेरचा पाण्याचा दाब हळूहळू वाढत जातो,ज्यामुळे दरवाजे उघडणे जवळपास अशक्य होते.मात्र या थोड्याशा वेळेत कारचे इलेक्ट्रिक सिस्टम बऱ्याचदा काम करत राहते. म्हणजे पावर विंडो उघडू शकतात. हीच तुमचा जीव वाचवण्यासाठी सर्वात मोठी संधी असते.