What is BH Series Number Plate?: राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जाताना किंवा फिरताना वाहनांच्या रजिस्ट्रेशनची कटकट आता कायमची मिटणार आहे. केवळ एका खास नंबर प्लेटमुळे तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात विनाअडथळा फिरता येईल. काय आहे ही नंबर प्लेट? ही नंबर प्लेट कुणाला मिळते? त्यासाठी कशी नोंदणी करायची? याबाबतची सर्व माहिती आम्ही सांगणार आहोत. या नंबर प्लेटबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:
जाणून घ्या या विशेष नंबर प्लेटची जादू
अनेकदा नोकरीत बदली झाली की, आपले वाहन दुसऱ्या राज्यात नेणे मोठे जिकीरीचे काम ठरते. नवीन राज्यातील आरटीओमध्ये जाऊन पुन्हा रजिस्ट्रेशन करणे, तिथला रोड टॅक्स भरणे आणि जुन्या राज्यातील टॅक्सचा परतावा मिळवणे, या चक्रात सर्वसामान्य माणूस अडकून पडतो. लोकांची हीच मोठी डोकेदुखी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 'BH' म्हणजेच 'भारत सिरीज' (Bharat Series) सुरू केली आहे. ज्या वाहनावर ही नंबर प्लेट असते, त्याला संपूर्ण भारतात कुठेही नवीन नोंदणी करण्याची गरज पडत नाही.
कोणाला मिळते ही 'पॉवरफुल' नंबर प्लेट?
ही सुविधा केवळ विशिष्ट नोकरी करणाऱ्या लोकांसाठीच उपलब्ध आहे
- केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व कर्मचारी.
- भारतीय लष्करातील जवान आणि अधिकारी.
- सरकारी बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे (PSU) कर्मचारी.
- खासगी क्षेत्रातील अशा कंपन्यांचे कर्मचारी, ज्यांची कार्यालये किमान 4 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही सुविधा फक्त तुमच्या स्वतःच्या खाजगी कार किंवा बाईकसाठीच आहे. टॅक्सी किंवा बस सारख्या कमर्शिअल गाड्यांना ही नंबर प्लेट घेता येत नाही.
( नक्की वाचा : Dalda Story : भारतीय किचनवर 90% ताबा असणारा डालडा अचानक गायब का झाला? 'ब्रँड' ते 'बॅड' प्रवासाचं कारण काय? )
खिशाला परवडणारा रोड टॅक्स
सामान्य वाहन घेताना आपल्याला 15 वर्षांचा रोड टॅक्स एकदाच भरावा लागतो, जो लाखांच्या घरात जाऊ शकतो. पण 'BH' सिरीजमध्ये हा टॅक्स दर 2 वर्षांनी भरण्याची सोय आहे. यामुळे वाहन खरेदी करताना सुरुवातीला खिशावर मोठा भार पडत नाही. जर तुमची गाडी डिझेल असेल तर 2 टक्के अतिरिक्त टॅक्स द्यावा लागतो, तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2 टक्के टॅक्समध्ये सवलत दिली जाते.
कशी ओळखाल ही नंबर प्लेट?
या नंबर प्लेटचा फॉरमॅट खूप वेगळा असतो. उदाहरणार्थ, '26 BH 1234 AB' अशा फॉरमॅटमध्ये हा नंबर असतो:
सुरुवातीचे दोन आकडे (उदा. 26) हे गाडीच्या नोंदणीचे वर्ष दर्शवतात.
त्यानंतर 'BH' हे अक्षर असते.
पुढील नंबर आणि अक्षरे ही 'वाहन' पोर्टलद्वारे आपोआप दिली जातात. यात तुम्हाला स्वतःच्या आवडीचा किंवा फॅन्सी नंबर निवडता येत नाही.
(नक्की वाचा : Edible Oil: विदेशी तेलाचा विळखा सुटणार! देशात खाद्य तेलात क्रांती होणार; पाहा काय आहे केंद्र सरकारचा नवा प्लॅन )
अर्ज करण्याची सोपी पद्धत
तुम्ही नवीन वाहन घेणार असाल, तर तुम्हाला शोरूममध्ये वाहन बुक करतानाच 'BH' नंबर हवा असल्याचे सांगावे लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे आयडी कार्ड आणि खाजगी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मिळालेला 'Form 60' द्यावा लागतो. सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी झाल्यानंतर आणि टॅक्स भरल्यानंतर 'वाहन' पोर्टलवरून हा नंबर जारी केला जातो.