Emotional Eating म्हणजे काय? भूक नसतानाही महिला का खातात? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

What is Emotional Eating? : महिलांची पावलं काही वेळा अचानक स्वयंपाकघराकडे किंवा फ्रीजकडे का वळतात?

जाहिरात
Read Time: 3 mins
What is Emotional Eating? : शेफालीनं चित्रपट सीनचा आधार घेत याबाबतचं सत्य सांगितलंय.
मुंबई:

What is Emotional Eating? :  घरात अचानक कोणाशी तरी मोठा वाद होतो, मन दुखावलं जातं, अपमान सहन करावा लागतो आणि अशा वेळी अचानक पावलं स्वयंपाकघराकडे किंवा फ्रीजकडे वळतात. समोर असलेली एखादी चॉकलेट पेस्टी, केक किंवा आवडीचा कोणताही पदार्थ समोर येतो आणि मनातील सगळा राग, दुःख विसरून तो खाल्ला जातो. 

अनेक महिलांच्या आयुष्यात कधी ना कधी असा प्रसंग नक्कीच आला असेल. भूक लागलेली नसतानाही केवळ मन शांत करण्यासाठी किंवा मनातील रिकामी जागा भरण्यासाठी अन्न खाण्याच्या या सवयीला 'इमोशनल ईटिंग' (Emotional Eating) म्हटलं जातं. एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं याच विषयावर अत्यंत मोकळेपणाने भाष्य केलं असून महिला अन्न खाण्याचा आधार का घेतात, यामागचं एक भावनिक सत्य जगासमोर मांडलं आहे.

Advertisement

'दिल धडकने दो' मधील त्या एका सीनचा रंजक खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह हिने 'दिल धडकने दो' या सिनेमातील तिच्या नीलम मेहरा या पात्राच्या एका गाजलेल्या सीनची आठवण करून देत महिलांच्या या मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. सिनेमात नवरा कमल मेहरा (अनिल कपूर) सोबत झालेल्या मोठ्या वादानंतर नीलम मेहरा अत्यंत अस्वस्थ होऊन चॉकलेट केक खाताना दिसते. 

हा निव्वळ एक सीन नव्हता, तर तो जगभरातील करोडो महिलांच्या मानसिकतेचा आरसा होता, असं शेफाली शाहनं म्हटलं आहे. जेव्हा एखादी महिला आतून पूर्णपणे तुटते, तिचा आदर आणि स्वाभिमान दुखावला जातो, तेव्हा ती जगापासून लपून अन्नाचा आश्रय घेते, असं ती सांगते.

( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
 

अन्न डाएट पाहत नाही, तर ते सुरक्षिततेची भावना देतं

शेफाली शाहच्या मते, अशा वेळी महिलांना अन्नाची भूक नसते, तर त्यांना हवी असते ती सुरक्षिततेची भावना. अन्न हे त्यांच्यासाठी एक असं हक्काचं ठिकाण बनतं, जे त्यांना कधीही जज करत नाही. अन्न कधीही कोणत्याही महिलेला वजन वाढल्यावरून टोमणे मारत नाही, वाढत्या कमरेच्या घेरावरून हसण्यावारी नेत नाही किंवा वजन मोजण्याच्या मशीनवर उभं राहण्याची सक्ती करत नाही. 

जेव्हा जग एखाद्या महिलेला कमी लेखतं, तेव्हा अन्न तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. ते तिला सुरक्षित असल्याचा आणि तिची काळजी घेणारं कोणीतरी असल्याचा भास करून देतं, म्हणूनच महिला इमोशनल ईटिंगकडे वळतात.

Advertisement

( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )

डाएट चार्ट देण्याऐवजी तिचं मन समजून घ्या

अनेकदा महिलांचं वजन वाढलं की लोक त्यांना लगेच डाएटचे सल्ले देऊ लागतात किंवा त्यांच्या शरीरावरून त्यांना कमेंट्स करू लागतात. पण शेफाली शाहने यावर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ती म्हणते की, एखाद्या महिलेच्या शरीरावर टीका करण्यापूर्वी लोकांनी तिच्या मनात चाललेली खळबळ समजून घेतली पाहिजे. 

तिला डाएट चार्ट देण्याऐवजी, ती नेमकी कोणत्या मानसिक त्रासातून जात आहे, तिला कोणतं दुःख सतावत आहे, हे ऐकून घेण्याची गरज आहे. केवळ तिचं ऐकून घेणं आणि तिला साथ देणं हेच तिच्यासाठी सर्वात मोठं औषध ठरू शकतं.

Advertisement

आपल्या अवतीभवती अनेक 'नीलम मेहरा' आहेत

सिनेमातील नीलम मेहरासारख्या असंख्य महिला आपल्या समाजात आहेत, ज्या इतरांनी दिलेल्या त्रासामुळे किंवा अपमानामुळे लपून-छपून खातात आणि स्वतःचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात. बाहेरील जगाच्या अपेक्षांचं ओझं वाहताना अनेकदा त्या स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतात. 

सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत शेफालीने शेवटी एकच आवाहन केलं आहे की, आपल्या घरात किंवा अवतीभवती अशा नीलम मेहरा असतील, तर इतरांनी किमान तिचं दुःख शांतपणे ऐकून घेणारे तरी बनावे. शेफाली शाहच्या या पोस्टने सध्या सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. 

इथे पाहा तो संपूर्ण सीन

Topics mentioned in this article