WhatsApp No Longer Free? : व्हॉट्सॲप वापरणाऱ्या जगभरातील कोट्यवधी युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत असलेल्या या मेसेजिंग ॲपचा अनुभव भविष्यात बदलण्याची शक्यता आहे. मेटा कंपनी व्हॉट्सॲपसाठी एका विशेष सबस्क्रिप्शन प्लॅनवर काम करत असून, लवकरच युजर्सना जाहिरातमुक्त अनुभवासाठी पैसे मोजावे लागू शकतात. या बदलामुळे व्हॉट्सॲपच्या मोफत सेवेच्या युगाला काही प्रमाणात ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.
काय आहे अपडेट?
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपच्या स्टेटस (Status) आणि चॅनेल्स (Channels) या विभागात जाहिराती दाखवण्याची तयारी मेटा कंपनीने केली आहे. गेल्या काही काळापासून यावर सातत्याने काम सुरू असून आता नव्या सबस्क्रिप्शन मॉडेलचे संकेत व्हॉट्सॲपच्या 2.26.3.9 या बीटा व्हर्जनच्या कोडमध्ये दिसून आले आहेत. तुम्हाला व्हॉट्सॲप वापरताना या जाहिराती नको असतील, तर कंपनीचा ठराविक सबस्क्रिप्शन प्लॅन विकत घ्यावा लागेल.
काय आहे बदलाचे कारण?
मेटा कंपनी केवळ जाहिराती हटवण्यासाठीच नाही, तर युजर्सना अधिक प्रगत अनुभव देण्यासाठी हे सबस्क्रिप्शन मॉडेल आणत आहे. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या काही महिन्यांत फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर हे नवीन मॉडेल टेस्ट केले जाईल.
( नक्की वाचा : Indian Railway : रेल्वे क्लर्कच्या एका 'क्लिक'ने प्रवाशाची रात्र झाली वैरी; कन्फर्म तिकीट असूनही भयंकर अनुभव! )
या पेड सबस्क्रिप्शनमध्ये युजर्सना अत्याधुनिक एआय (AI) फिचर्स आणि काही प्रीमियम टूल्स मिळतील, ज्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि कामाची गती वाढवण्यास मदत होईल. विशेषतः कंटेंट क्रिएटर आणि बिझनेस युजर्सना डोळ्यासमोर ठेवून हे बदल केले जात असल्याचे समजते.
यामध्ये कंपनीने अलीकडेच 2 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केलेल्या 'Manus' या एआय एजंटचा देखील समावेश असू शकतो. हा एआय एजंट युजर्सना अवघड कामे अधिक सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यास मदत करेल. याशिवाय इंस्टाग्रामवर अनोनिमस स्टोरी व्ह्यू आणि प्रगत व्हिडिओ एडिटिंग टूल्स सारख्या सुविधा देखील या सबस्क्रिप्शन पॅकेजचा भाग असू शकतात.
कोणत्या सुविधा मोफत?
व्हॉट्सॲप पेड होणार असल्याच्या बातमीमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, कंपनीने एक मोठा दिलासाही दिला आहे. व्हॉट्सॲपच्या मुख्य आणि मूलभूत सेवा, जसे की मेसेजिंग आणि कॉलिंग, नेहमीप्रमाणे मोफतच राहतील. सबस्क्रिप्शनचा हा प्रयोग केवळ जाहिरातमुक्त अनुभव आणि अतिरिक्त प्रीमियम फिचर्सपुरता मर्यादित असेल. ज्या युजर्सना जाहिरातींनी काही फरक पडत नाही, ते आधीप्रमाणेच विनामूल्य व्हॉट्सॲप वापरू शकतील.
( नक्की वाचा : T20 WC 2026 : पाकिस्तान क्रिकेटचा THE END?वर्ल्ड कपमधून माघार घेतली तर PSL ही होणार उद्ध्वस्त ! )
मेटा कंपनी या सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सुरुवातीला काही ठराविक देशांमध्ये याची टेस्टिंग केली जाईल आणि तिथल्या युजर्सच्या फीडबॅकनंतरच जागतिक स्तरावर हा बदल लागू केला जाईल. यामुळे आता व्हॉट्सॲपच्या स्टेटस विभागात जाहिराती पाहण्यासाठी तयार राहावे लागणार की पैसे देऊन त्या बंद कराव्या लागणार, हे येणारा काळच ठरवेल.