Wildlife News: पाणथळीच्या पऱ्या! छोट्याशा आयुष्यातही करतात महत्त्वाचं काम

चतुरांची एक जात वॉंडरिंग ग्लायडर (Pantala flavescens) हे भटके चतुर चक्क स्थलांतर करतात आणि थोडेथोडके नाही तर जवळ जवळ18 हजार किलोमीटरचे अंतर कापतात.

जाहिरात
Read Time: 4 mins
Wildlife News: कोण आहेत पऱ्या?

- हर्षदा कुलकर्णी 

Difference Between Dragonflies And Damselflies : एखाद्या छोट्या तळ्याच्या, ओढ्याच्या, काठाने फिरताना तुम्ही कधी पऱ्या उडताना पाहिल्यात का? हेलिकॉप्टरसारख्या भर्रभर्र उडणाऱ्या तलम, पारदर्शक, जाळीदार पंखांच्या, काळ्या, पिवळ्या, निळसर, विविध रंगाच्या, सुंदर पऱ्या. मी तर नेहमीच त्यांच्या हवेतल्या कसरती थक्क होऊन पाहताच राहते. नाही हे कुठल्या पक्ष्याचे वर्णन नाहीये तर मी सांगतेय ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमझेलफ्लाय (टाचणी) या कीटकांबद्दल. संधिपद संघाच्या ओडोनेटा(Odonata) गणातील या कीटकांना मराठीत आपण अनेक नावांनी ओळखतो जसे की चतुर, भिंगरी इत्यादी. हिंदीत यांना 'व्याधपतंग' असे म्हणतात तर यांचं इंग्रजी नाव आहे ड्रॅगनफ्लाय (Dragonfly). या ओडोनेटा गणात चतुरांसारखेच दिसणारे आणखी एक कीटक येतात. हे जरा नाजूक असल्याने त्यांना आपण मराठीत टाचणी किंवा सुई असे म्हणतो आणि इंग्रजीत डॅमझेलफ्लाय (Damselfly).

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कीटकांच्या नावामागील कहाणी

(Dragonfly) ड्रॅगनफ्लाय हे नाव कसे आले तर एका प्राचीन रोमन लोक कथेनुसार सैतानाने एका संतांच्या घोड्याचे रूपांतर एका मोठ्या, उडणाऱ्या किड्यात केले होते. या किड्याला लोक सैतानाचा घोडा किंवा सैतानाची माशी असंही म्हणू लागले पण रोमन भाषेतील घोड्यासाठी असलेला शब्द 'Drac'चा अजून एक अर्थ Dragon असाही होतो. मग इंग्रजी भाषेत येताना याचा अनुवाद झाला Dragonfly (ड्रॅगनफ्लाय) या कीटकांचे जीवनचक्र खरोखरच आश्चर्यकारक असते.चतुर माद्या पाणवनस्पतींवर आपली अंडी घालतात तर टाचणीच्या काही जातींमध्ये तर माद्या पाण्याखाली अंडी घालतात. अंड्यांमधून बाहेर आल्यावर जवळजवळ तीन ते पाच वर्षाचा काळ यांचे डिंभ पाण्याखाली काढतात. या काळात त्यांच्या तोंडाच्या खालच्या भागाचे रुपांतर वेगाने बाहेर फेकता येईल, अशा प्रकारच्या लवचिक जबड्यात होते. त्यामुळे चतुरांची ही पिल्ले अत्यंत निष्णात शिकारी असतात. डासांच्या अळ्या, पाण्यातील कीटक, लहान मासे हे यांचे खाद्य.

Photo Credit: Harshada Kulkarni

कीटकांचे आयुष्य किती असते?

या काळात विकासाच्या अनेक अवस्थांमधून जात अखेर चतुर अर्भके कोषावस्थेत जातात. पाण्यातून बाहेर आलेले एखादे गवताचे पाते, पाणवनस्पतींच्या काड्या यावर असे कोश दिसू शकतात. कोषातून बाहेर आल्यानंतर काही तास विश्रांती घेतल्यावर त्यांचे पंख सुकतात आणि आपण नेहमी पाहतो ते सुंदर रंग यांच्या शरीरावर दिसू लागतात. पाण्याबाहेर आल्यावर मात्र यांचं आयुष्य साधारण दोन तीन आठवडे ते काही महिने एवढेच असते. या छोट्याशा आयुष्यातही अनेक डास, माश्या, चिलटांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचं महत्त्वाचं काम हे करतात.

Advertisement

चतुर आणि टाचणीतील फरक 

चतुर आणि टाचणी वरवर जरी सारखेच दिसत असले तरी यांच्यात थोडा फरक करता येतो. जसं की चतुरांचे डोळे साधारणतः एकमेकांना जुळलेले असतात तर टाचण्यांच्या डोळ्यांमध्ये अंतर असते. चतुराचे शरीर थोडेसे जाड असते तर टाचणी अगदी नाजूक अन निमुळती असते. काही अपवाद वगळता विश्रांती घेताना चतुरांचे पंख उघडलेल्या अवस्थेत असतात तर बऱ्याचशा टाचण्या (अपवाद सोडल्यास) मात्र पंख मिटलेल्या अवस्थेत बसतात. चतुरांचे डोळेही काही कमी विलक्षण नाहीत. त्यांच्या डोक्याचा बहुतांश भाग हा डोळ्यांनीच व्यापलेला असतो आणि या दोन डोळ्यांत मिळून जवळजवळ तीस हजार नेत्रिका व भिंगे असतात. या संयुक्त डोळ्यांमुळे (compound eyes) चतुरांना निरनिराळ्या बाजूंना एकाचवेळी बघता येते. या सोबतच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे चतुर आपला एक एक पंख स्वतंत्रपणे हलवू शकतो. त्यामुळेच तर त्यांना हवेत एवढ्या कसरती करता येतात.

Advertisement

आता आणखी एक विशेष गोष्ट अशी की चतुरांची एक जात वॉंडरिंग ग्लायडर (Pantala flavescens) हे भटके चतुर चक्क स्थलांतर करतात आणि थोडेथोडके नाही तर जवळ जवळ18 हजार किलोमीटरचे अंतर कापतात. भारतातही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्वोत्तर भारताकडून निघून पश्चिम तटाकडून परतीच्या प्रवासाला आफ्रिकेला जाणारे थवेच्या थवे दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. या त्यांच्या स्थलंतराला "ग्रेट इन्सेक्ट मायग्रेशन" (great insect migration) असे म्हटले जाते. हे त्यांचे अनेक पिढ्यांचे स्थलांतर असते. हे त्यांचे पूर्वोत्तर भारत ते आफ्रिका आणि परत असे प्रवासचक्र पिढ्या-न्-पिढ्या अनेक वर्षे अव्याहत चालू आहे. 

Advertisement

अशाच एखाद्या संध्याकाळी हलकासा पाऊस पडून गेलेला असतो आणि तरीही थोडी उन्हं क्षिल्लक असतात. गवताचा अन् ओल्या मातीचा सुवास दरवळत असतो, अशावेळी मागे रेंगाळणाऱ्या काही शेवटच्या किरणांना पंखांवर घेऊन चतुरांचे थवे आभाळभर उभ्या आडव्या सोनसळी रांगोळ्या काढायला लागतात तेव्हा वाटतं की डायनासोरच्या ही आधी पासून पृथ्वीवर राहणाऱ्या या पऱ्या अशाच कायम उडत राहाव्या अगदी इथून पुढची लाखो वर्षे.

(लेखिकेला पक्षी व कीटक निरीक्षण, निसर्गविषयक लेखन आणि मॅक्रो फोटोग्राफीची विशेष आवड आहे.)