Plumber Electrician Shortage India: कल्पना करा, तुमच्या घरातील नळ खराब झाला आहे किंवा शॉर्ट सर्किट झाले आहे, पण ते दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण शहरात एकही प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन उपलब्ध नाही. ही केवळ कल्पना नाही, तर येत्या 5 वर्षांत भारतासमोर उभे ठाकणारे एक भयावह वास्तव असू शकते. एका बाजूला सुशिक्षित बेरोजगारांची फौज आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिक कामांसाठी माणसांची वानवा, अशा विचित्र कात्रीत भारत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इंजिनिअर्स मिळतील पण प्लंबर नाही?
कॅनडातील 'पाईनट्री' या संशोधन संस्थेचे संस्थापक रितेश जैन यांनी हा धक्कादायक इशारा दिला आहे. त्यांच्या मते, भारताकडे इंजिनिअर्सची कमतरता कधीच नसेल, पण प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन शोधताना मात्र नाकीनऊ येईल. विकसित देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे आणि तरुणांची संख्या कमी होत आहे. परिणामी, युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश आता भारताच्या 'ब्लू कॉलर' कामगारांवर (प्लंबर, सुतार, ड्रायव्हर इ.) लक्ष केंद्रित करत आहेत.
जागतिक बाजारपेठेत भारतीय कौशल्याची वाढती मागणी
युरोपमधील सुमारे 75 टक्के कंपन्यांना सध्या कुशल कामगार शोधताना अडचणी येत आहेत. जर्मनीसारख्या औद्योगिक देशात तर 80 टक्के मालकांनी हीच तक्रार केली आहे. जगभरात सध्या 'व्हाईट कॉलर' (ऑफिसमधील कामे) करणारे लोक जास्त आहेत, पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या 'ब्लू कॉलर' कामगारांची मोठी टंचाई आहे. ही दरी भरून काढण्यासाठी विकसित देश आता भारतीय तरुणांना आक्रमकपणे आपल्याकडे आकर्षित करत आहेत.
( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )
भारतासाठी 'टिकाऊ टाइम बॉम्ब'
रितेश जैन यांच्या मते, येत्या 5 वर्षांत भारत आपल्या कष्टाळू तरुणांना गमावेल. याचे मुख्य परिणाम खालीलप्रमाणे दिसू शकतात:
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार आणि ड्रायव्हर्सची मोठी टंचाई निर्माण होईल.
- परिचारिका (नर्सेस) आणि केअरगिव्हर्सची मोठ्या प्रमाणावर परदेशात हिजरत होईल.
- श्रीमंत देश केवळ अशाच स्थलांतरितांना प्राधान्य देतील ज्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य आहे.
पदव्या आहेत पण नोकऱ्या नाहीत
भारतातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे इथली शिक्षण पद्धती. भारत दरवर्षी लाखो पदवीधर (ग्रेज्युएट्स) तयार करत आहे, पण त्यांच्यासाठी व्हाईट कॉलर नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आकडेवारीनुसार, सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारीचा दर तब्बल 40 टक्क्यांच्या जवळ आहे. फक्त 14 पैकी एकाच पदवीधराला त्याच्या पहिल्या वर्षात कायमस्वरूपी नोकरी मिळते.
( नक्की वाचा : तुमचं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? भारताची होर्मुजच्या कटकटीतून सुटका, आता या देशातून येणार स्वस्त तेल )
भविष्यातील विचित्र पेचप्रसंग
जैन यांनी आपल्या पोस्टमध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. ते म्हणतात, "पाच वर्षांत भारताकडे नळ दुरुस्त करायला माणूस नसेल, कारण ते सर्व श्रीमंत देशांत निघून गेले असतील. आपल्याकडे उरतील ते फक्त पदव्या हातात घेऊन फिरणारे मुले, ज्यांना भारतात नोकरी नाही आणि ज्यांची परदेशात गरज नाही."
थोडक्यात सांगायचे तर, जागतिक मागणी आणि भारताचा पुरवठा यात मोठी तफावत आहे. जर आपण तांत्रिक कौशल्यांकडे लक्ष दिले नाही, तर भविष्यात 'डिग्री' असूनही रोजगारासाठी वणवण करण्याची वेळ येऊ शकते.