वाशिम जिल्ह्यात केकत उमरा गावातील पांडुरंग उचितकर हे सध्या चर्चेत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पांडुरंग यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 14 अंध मुलांना दत्तक घेतले आहे. एवढेच नाही तर ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना रोजगारही मिळवून दिला आहे. पांडुरंग यांचा एक मुलगा जन्मताच अंध आहे. त्याला येणाऱ्या अडचणी पाहून त्यांनी अन्य अंध मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
मुलापासून मिळाली प्रेरणा
वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा येथील पांडुरंग उचितकर यांना चेतन नावाचा मुलगा आहे. तोही जन्मताच अंध आहे. त्यामुळे चेतनला सांभाळत असताना अंधांच्या समस्या त्यांनी जवळून पाहील्या. त्यानंतर पांडुरंग यांनी अंध मुलांचा साभाळ करण्याचा निर्णय घेतला. एक एक करत आता ते 14 अंध मुलांचा सांभाळ करतात. या अंध मुलांनाही पाडुरंग यांचा आधार वाटतो. पांडुरंग यांची घरची स्थिती ही फारशी चांगली नाही. तरही त्यांनी या 14 मुलांना सांभाळण्याचे धाडस केले.
रोजगाराचीही दिली संधी
चौदा मुलांना सांभाळणे ही तशी अवघड गोष्ट होती. यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे, ज्यामुळे मुलांच्या हाताला कामही मिळेल आणि उदरनिर्वाह ही होईल असा विचार पांडुरंग यांनी केला. त्यातून या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशांने त्यांनी ऑर्केस्ट्रा सुरू केला. त्याचे प्रशिक्षण ही मुलांना दिले. त्यातून चेतन सेवांकुर हा ऑर्केस्ट्राला नावारूपाला आला. या माध्यमातून सध्या समाज प्रबोधनावर कार्यक्रम केले जातात. शिवाय लग्नातही या ऑर्केस्ट्राला मोठी मागणी आहे. यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे.
हेही वाचा - सोन्याच्या भावाचा विक्रमी उच्चांक, 75 हजार रुपये तोळा झाली किंमत
अंधांची लग्न लावण्यात पुढाकार
पांडुरंग उचितकर हे तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी जिल्ह्यातल्या अंध तरूण आणि तरूणींच्या विवाहासाठीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी काही विवाह ही लावून दिले आहेत. येणाऱ्या काळात अंधासाठी आणखी काम करण्याचा मानस पांडुरंग यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - भन्नाट ऑफर! मतदान करा... बोटाची शाई दाखवा... मोफत केस कापा...