देवाची सगळीकडेच पुजा केली जाते. पण राक्षसाची पुजा केली जाते असे कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण हो असे एक गाव आहे जिथे देवाची नाही तर राक्षसाची मनोभावे पुजा केली जाते. अशी पुजा करणारे देशातील हे एकमेव गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. राक्षसाची पुजा करण्यामागे इतिहासही सांगितला जातो. विशेष म्हणजे हा राक्षस नवसालाही पावतो अशी इथल्या गावकऱ्यांची धारणा आहे.
राक्षसाची पुजा करणारं गाव
राक्षसाची म्हणजेच दैत्याची पुजा करणारे गाव म्हणजे अहमदनगरचं दैत्यनांदूर गाव. या गावात श्री निंबादैत्य महाराजांची यात्रा पाडव्याच्या दिवशी होते. ग्रामस्थ पडावा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवतात. पाडव्याचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यावेळी गंगेचे पाणी आणलेली कावडी, अभिषेक महाआरती असे विवीध कार्यक्रम आणि विधी होतात. या गावाचा अनोखा महिमा असून या गावाचे दैत्य महाराज हे ग्रामदैवत आहे. विशेष म्हणजे गावात हनुमंताचे नाव घेता येत नाही. त्यामागेही एक इतिहास आहे. पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे की, जिथं दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते. गावाची ओळख ही दैत्यांच्या नावाने आहे.
राक्षसाची पुजा करण्या मागे काय आहे इतिहास
निंबादैत्य व हनुमंत दोघांत घनघोर असे गदा युद्ध झाले होते. त्यात दोघही जखमी झाले. त्यावेळी निंबादैत्याने प्रभुरामाचा धावा केला होता. त्यानंतर प्रभूराम तिथे प्रकट झाले होते. त्याच वेळी राम निंबादैत्याला बरे करतात. शिवाय त्याला वरही देतात. या गावात तुझेच नाव निघेल. तुझे मंदिरही बांधले जाईल. रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात, तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असे सांगितले आहे. मग हे कसे शक्य आहे. त्यावर प्रभू राम म्हणतात, गाव तुझेच. इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही. अशा पुराणात उल्लेख सापडतो. तेव्हा पासून यागावात राक्षसाचा म्हणजेच निंबादैत्याचीच पुजा केली जाते.
गावात हनुमानाचं घेत नाहीत नाव
दैत्यनांदूर गावात हनुमंताचं नावही घेतलं जात नाही. ऐवढच काय तर लहान मुलाचंही नाव कोणी मारूती किंवा हनुमान ठेवत नाहीत. दैत्यनांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळत आलं आहे. इथला भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. घर, गाडीवर तर दुकानांची नावे श्री निंबादैत्य या नावाने गावामध्ये आहेत.