सुनील दवंगे, अहिल्यानगर:
Ahilyanagar Car Truck Accident: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर–संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका लहान मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
सेकंड हँड कार, 10 दिवसात घात!
मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी दुपारी झालेल्या ह्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे.
श्रीरामपूर येथील चव्हाण कुटुंबीयांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वीच सेकंडहँड स्विफ्ट कार खरेदी केली होती. आज हे कुटुंब आपल्या लहान मुलांसह तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी निघाले असताना हा भीषण अपघात झाला. प्रशांत रमेश चव्हाण (24), संगीता अनिल चव्हाण (40), सिद्धार्थ सुनील चव्हाण (16), सारिका अनिल चव्हाण (30), ऐश्वर्या अशोक चव्हाण (26) ऋत्वी अशोक चव्हाण (3) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
तर रुद्र अशोक चव्हाण (6) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या भीषण घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
( नक्की वाचा : Pune News : वेटर ते आंतरराष्ट्रीय तस्कर, बुधवार पेठेतील महिलांच्या नशिबाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित उघड )