Ahilyanagar Fire: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. मयूर रासने यांच्या कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. आगीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबाला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत मयूर अरुण रासने वय (45 वर्षे) पत्नी पायल मयूर रासने (वय 38 वर्षे) तर दहा वर्षाचा मुलगा अंश मयूर रासने आणि सात वर्षीय धाकटा मुलगा चैतन्य मयूर रासने यांचा होरपळून मृत्यू झाला.
नेवासा पोलीस ठाणे हद्दीत मयूर रासने यांचे फर्निचरचे दुकान आहे. दुकानाच्या वरच मयूर रासणे हे त्यांच्या पत्नी व मुलासह राहतात. सोमवारी मध्यरात्री या दुकानाला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की वरच्या मजल्यावर झोपलेले रासने कुटुंबांतील चौघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत 25 वर्षीय यश किरण रासने याच्यासह एक 70 वर्षीय वयस्कर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मयूर अरुण रासने (वय 45 वर्ष), पायल मयूर रासने (वय 38 वर्ष), अंश मयूर रासने (वय 10 वर्ष) चैतन्य मयूर रासने (वय 7 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भीषण दुर्घटनेने नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.