प्रसाद शिंदे, अहिल्यानगर:
Ahilyanagagar News: 'उद्याचा दिवस उजाडायच्या आत त्याचं कुटुंब या परिसरात राहता कामा नये याची खबरदारी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे' असे धक्कादायक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. अहिल्यानगरमधील शेवगाव येथे झालेल्या हिंदू जनजागृती मोर्चावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या वक्तव्याने संताप व्यक्त केला जात आहे.
काय म्हणाले आमदार संग्राम जगताप?
समोर आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे हिंदू जनजागृती मोर्चा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शेवगाव शहरातील इंदीरानगर येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी सोहेल राजू शेख याच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चानंतर झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित आरोपीच्या कुटुंबाबाबतही त्यांनी भूमिका मांडत समाजाने या घटनेविरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. सोबतच उद्याच्या दिवस उजाडायच्या आत त्याचं कुटुंब या परिसरात राहता कामा नये याची खबरदारी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे असा इशारा जगताप यांनी दिला आहे.
"त्यांच्या रेशन कार्डवर ज्या लोकांचे नाव आहे त्या रेशन कार्डवरचा व्यक्ती इथे राहता कामा नये, जोपर्यंत आपण असा निर्णय घेणार नाही तोपर्यंत या लोकांच्या लक्षात येणार नाही आपण त्यांच्या मागे लागलो. काही लोक माफी मागायला येतील, मात्र आपल्या लेकराचा जीव गेला आहे ते कुटुंब इथं राहता कामा नये," असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
"जर पोलिसांना वाटत असेल ते लोक लॉयन ऑर्डरचा प्रश्न निर्माण करतील तर हिंदू समाजाने देखील प्रश्न निर्माण केला पाहिजे तरच उद्याच्या काळात लोकांची हिम्मत होणार नाही असंही संग्राम जगताप यावेळी म्हणाले. उद्या सूर्य उजाडाच्या आत तुम्ही निर्णय घेतला पाहिजे ते कुटुंब येथे दिसता कामा नये, तेव्हाच या लोकांचे धाडस होणार नाही," अशी चिथावणी देणार वक्तव्य जगताप यांनी केले आहे.