योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Acola Accident News : अकोल्यातील शिवसेना शिंदे गटाचे अकोला संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांचा परतीच्या प्रवासात भीषण अपघात झाला. पंचगव्हाण फाट्याजवळ इरटिका गाडी पलटी होऊन झालेल्या या अपघातात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अक्षय म्हसाळ असे मृतक व्यक्तीचे नाव असून जखमींमध्ये अनिकेत ढवळे (शिवसेना शिंदे गट तेल्हारा शहर प्रमुख), निखिल हिवराळे (शहर उपाध्यक्ष), अंकित खंडारे, राजेश गावत्रे आणि शिवराम गिरी यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईक आणि कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
( नक्की वाचा : Emotional Post 'कॅन्सरने जिंकले, मित्रांनो', 21 वर्षांच्या तरुणाची 'शेवटची' दिवाळी पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले )
अकोल्याचे विधान परिषद माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा काल (बुधवार, 15 ऑक्टोबर) वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करून कार्यकर्ते परतत असताना अंदाजे रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनंतर जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा अपघात कार्यकर्त्यांच्या आनंदमय वातावरणात अचानक दुःखाचा काळा ढग घेऊन आल्याने तेल्हारा तालुका तसेच अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.