योगेश शिरसाट प्रतिनिधी,
Akola News: अकोला जिल्ह्यातील माझोड येथे मागील वर्षी शेतात गुरे चारण्याच्या वादातून वैर धरून यंदा एका मागासवर्गीय शेतकऱ्याचे सोयाबीन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी प्रमोद महादेव सोळंके यांनी आजपासून (मंगळवार., 28 ऑक्टोबर 2025) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
नेमके काय घडले?
शेतकरी प्रमोद सोळंके यांनी अत्यंत मेहनतीने सोयाबीन पिकाची लागवड केली होती. मात्र, दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गावातील काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी त्यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लावली. या आगीत सोळंके यांचे संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.सोळंके यांनी गावातील सात संशयित व्यक्तींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.
सोळंके यांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, पातूर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत संशयितांची नावे समाविष्ट न करता अज्ञात व्यक्तींविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाकडून होत असलेल्या या दुर्लक्षाबद्दल सोळंके यांनी तीव्र निषेध केला आहे.
सोळंके यांनी सांगितले की, या जमिनीवरून यापूर्वीही वाद होऊन ॲट्रॉसिटी कायद्याखाली (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणातील काही आरोपींना कोर्टातून जामीन (Bail) मिळाला होता. मात्र, त्यांनी पुन्हा असे विघ्नसंतोषी कृत्य केल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड )
मागील वर्षी गुरे चारली, यंदा पीक जाळले!
सोळंके यांनी आरोप केला आहे की, गेल्या वर्षीही याच वादातून दहा जणांविरुद्ध त्यांच्या पिकात गुरे चारल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच जुन्या वादातून वैर धरून यंदा त्यांच्या पिकाला आग लावण्यात आली.
गेली 30 वर्षांपासून शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याचे सर्वस्व या घटनेत जळून खाक झाले आहे. 'आता आत्महत्येव्यतिरिक्त पर्याय नाही,' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: भयानक! 'उधारी' विचारणे दुकानदाराच्या जीवावर बेतले; कल्याणजवळ धक्कादायक प्रकार )
या प्रकरणात यांनी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दोषींवर कठोर कारवाई करून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी, तसंच आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी केलीय. या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपले आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.