- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात ५०० रुपयांच्या लालसेसाठी १८ एकर शेतीला आग लावल्याचा गंभीर प्रकार
- आगीत संत्रा, सिताफळ, आंबा, बांबूची झाडे तसेच शेतीसाठी आवश्यक साहित्य जळून खाक झाले आहे
- या आगीत शेतकऱ्यांना तब्बल दहा लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे
योगेश शिरसाट
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ 500 रुपयांच्या लालसेपोटी तब्बल 18 एकर शेतीला आग लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भीषण आगीत संत्रा, सिताफळ, आंबा आणि बांबूची झाडे जळून खाक झाली असून शेतकऱ्याचे तब्बल 10 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी वाऱ्या सारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यानंतर हळहळ आणि संताप ही व्यक्त केला जाता आहे.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे मुकुंद उर्फ पंकज अग्रवाल हा शेतकरी राहतो. यांच्या चिचारी शिवारातील शेताला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. शेताला आग लागली आहे याची माहिती मुकुंद यांचे मित्र शेर खान यांनी त्यांना दिली. त्यानंतर ते शेतकरी अग्रवाल तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांचे संपूर्ण शेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. या आगीत शेकडो फळझाडे जळून खाक झाली. त्यात 3500 बांबू, गोठा, खताची पोती तसेच ड्रिप आणि स्प्रिंकलरचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. संत्रा, सिताफळ, आंब्याची झाले ही जळून खाक झालीत.
आग इतकी भीषण होती की काही काळासाठी चिचारी आणि चंदनपूर गावांनाही धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र ही आग कोणी लावली हा खरा प्रश्न होता. याबाबत तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर हिवरखेड पोलिसांनी चक्र फिरवली त्यांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक ही केली.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव रमेश मंगल कासदेकर असे आहे. त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. शिवाय त्याची चौकशी ही केली. त्यावेळी त्याने धक्कादायक गोष्ट पोलीसांना सांगितली. त्याने चौकशीदरम्यान सांगितले की त्याला एका अनोळखी व्यक्तीने 500 रुपये दिले. त्या बदल्यात त्याने शेताला आग लावण्यास सांगितली. मात्र तो अनोळखी व्यक्ती कोण हे त्याला सांगता आले नाही. मात्र 500 रूपयांसाठी आपण शेताला आग लावल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. महसूल आणि कृषी विभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.