Akola News: धक्कादायक! अकोल्यात गॅस बुकिंगच्या रांगेत माजी सरपंचाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Akola News: अकोला शहरातील गौरक्षण रोडवर असलेल्या यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे असताना एका माजी सरपंचाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News: रांगेत उभे असतानाच ते जमिनीवर कोसळले आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: अकोला शहरातील गौरक्षण रोडवर असलेल्या यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे असताना एका माजी सरपंचाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. प्रखर उन्हात तासन्तास उभे राहिल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव शंकर फपूर्डाजी शिरसाट (रा. अन्वी मिर्जापूर) असे असून ते गावाचे माजी सरपंच होते. गॅस केवायसी आणि बुकिंगच्या कामासाठी ते दुपारी या एजन्सीवर आले होते, जिथे त्यांच्यावर काळाने झडप घातली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव शिरसाट हे दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास गॅस एजन्सीबाहेर असलेल्या लांबच लांब रांगेत उभे होते. मार्च महिन्यातील वाढता उन्हाचा तडाखा आणि त्यातच तब्बल 3 ते 4 तास रांगेत उभे राहिल्याने त्यांना अचानक चक्कर आली. 

Advertisement

रांगेत उभे असतानाच ते जमिनीवर कोसळले आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. गॅस एजन्सीवर पिण्याचे पाणी किंवा सावलीची कोणतीही सोय नसल्याने हा नाहक बळी गेल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.

( नक्की वाचा : New COVID: कोरोनाचं रूप बदललं! BA.3.2 चा जगभर धुमाकूळ; ताप, खोकला की आणखी काही? नवी लक्षणं आली समोर )

शंकरराव शिरसाट हे अन्वी मिर्जापूर गावचे माजी सरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानक निधनामुळे गावावर मोठी शोककळा पसरली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एका व्यक्तीचा अशा प्रकारे गॅसच्या रांगेत मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अन्वी मिर्जापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस एजन्सीच्या नियोजनातील त्रुटींमुळेच ही दुर्घटना घडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित यदुराज गॅस एजन्सीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच गॅस वितरण आणि एजन्सीवर येणाऱ्या लोकांसाठी पाणी व सावलीची व्यवस्था सक्तीची करावी, असेही त्यांनी प्रशासनाला सुचवले आहे.

सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

सध्या गॅस जोडणीच्या विविध कामांसाठी सर्वच एजन्सीवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, तासन्तास उन्हात उभे राहणाऱ्या ग्राहकांसाठी साध्या मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा उघड झाले आहे. एका सामान्य नागरिकाचा अशा प्रकारे बळी गेल्यानंतर आता गॅस कंपन्या आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article