योगेश शिरसाट, अकोला
अकोल्यात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दहा दिवसांच्या बाळाला पित्यानेच आईपासून जबरदस्तीने वेगळं केल्याने, बाळाची आई ही मुलाला पाहण्यासाठी व्याकूळ झाली असून, न्याय मिळावा यासाठी तिची पोलीस ठाण्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत धावपळ सुरू आहे.
कुटुंबीयांमध्ये दीर्घकालीन कौटुंबिक वाद...
दरम्यान अकोल्याच्या मेहर बानो मोहम्मद शाकिब या मूळच्या अकोल्यातील बाळापूर भागातील रहिवासी महिलेचा विवाह मुर्तिजापूर येथील मोहम्मद शकीब मोहम्मद आशाद यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्वकाही सुरळीत असतानाच, दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू झाले. या वादाचे पर्यवसान सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासात झाले.
यादरम्यान, दोन महिन्यांपूर्वी, अर्थातच 20 मे रोजी मेहर बानो गरोदर असताना तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिला बाळंतपणासाठी आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यावेळी पती आणि सासरच्यांनी त्यांच्या सोबतही मारहाण केली. याबाबत मेहर बानोने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दहा दिवसांच्या बाळाला पित्याने हॉस्पिटलमधून जबरदस्तीने नेले
दरम्यान, 25 जुलै रोजी मेहर बानोची प्रसूती झाली आणि तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. बाळाच्या जन्मानंतर तरी पती-पत्नीमधील वाद मिटेल अशी अपेक्षा होती, मात्र परिस्थिती अधिकच बिघडली. दहा दिवसांच्या बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला अकोल्यातील शुक्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याच दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी, पती मोहम्मद शकीबने रुग्णालयातूनच बाळाला जबरदस्तीने घेऊन गेला.
नक्की वाचा - Palghar Shocking Video : मालकिणीचा मुजोरपणा, आंदोलनादरम्यान कामगारांच्या अंगावर घातली गाडी
पोलीस ठाण्याने दखल न घेतल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार..
बाळाला आईच्या मायेपासून दूर नेण्यात आलं असल्याने, मेहर बानोने अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं.
आईचा पोलिसांकडे आक्रोश: “माझं बाळ मला परत द्या” आईच्या आत्महत्येच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली...
तक्रार देताना मेहर बानोचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. “माझं बाळ मला परत द्या, मला न्याय द्या. अन्यथा मी स्वतःच्या जीवाचं काही तरी करेन, असा इशाराच तिने दिला. आईची ही धावपळ आणि अश्रू मनाला हेलकावणी देणारं आहे. सध्या या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतं, बाळाची माया मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या आईला न्याय मिळतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र ही घटना केवळ कौटुंबिक वादापलीकडची असून, एका आईच्या मायेचा आणि मूलाच्या हक्काचा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित आईला न्याय द्यावा, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.