योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: पहाटेची वेळ, शांत रस्ता आणि हातावर पोट असणारे एक कुटुंब आपल्या प्रवासाला निघाले होते. पुढच्या काही मिनिटांत काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. अचानक एका भरधाव वाहनाचा धक्का बसतो आणि होत्याचे नव्हते होते. एका क्षणात एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत होतो.
हा अपघात फक्त दोन जणांचा जीव घेऊन गेला नाही, तर दोन तरुण मुलींच्या डोक्यावरील मायेचे छत्र कायमचे हिरावून घेऊन गेला आहे. ज्या वयात हाताला धरून भविष्याची स्वप्ने पाहायची, त्याच वयात त्या दोन मुलींवर आपल्या आई-वडिलांच्या मृतदेहाकडे पाहत आक्रोश करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अकोल्यात एका बेजबाबदार चालकाच्या चुकीमुळे दोन शिक्षण घेणाऱ्या बहिणी अनाथ झाल्या असून त्यांच्या आयुष्यात आता कधीही न भरून निघणारा अंधार दाटून आला आहे.
एका भीषण धडकेने दोन मुलींचे संपूर्ण जगच उद्ध्वस्त केले आहे. दोन्ही मुली सध्या शिक्षण घेत असून आता त्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार, असा अत्यंत वेदनादायक सवाल निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण अकोल जिल्हा हादरला असून दोन निष्पाप मुलींच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवल्याने परिसरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
( नक्की वाचा : Akola News: NEET पेपरफुटीचे धागेदोरे अकोल्यात; आरसीसीच्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात )
कसा झाला अपघात?
हा काळीज पिळवटून टाकणारा अपघात अकोला येथील अकोला-दर्यापूर रोडवरील खराप परिसरात घडला आहे. नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजताच्या सुमारास खराप बुद्रुक येथील रहिवासी विजय पांडुरंग इंगळे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा विजय इंगळे हे दुचाकीने जात होते. हे दाम्पत्य हातावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा आणि दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च चालवत होते.
मात्र, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी लागली आणि त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. या भरधाव ट्रकने इंगळे यांच्या दुचाकीला मागून एवढी भीषण धडक दिली की, पती-पत्नी हवेत अनेक फूट दूर फेकले गेले. या भीषण अपघातात विजय आणि प्रतिभा या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन शिक्षण घेणाऱ्या मुली झाल्या अनाथ
या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मृत इंगळे दाम्पत्याच्या पश्चात त्यांच्या दोन मुली आहेत. या दोन्ही मुली सध्या शिक्षण घेत असून त्यापैकी एक मुलगी 12 वी मध्ये शिकत आहे. आई-वडील मजुरी करून आपल्या दोन्ही मुलींना शिकवत होते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्ट करत होते. एका रात्रीत आई आणि वडील दोघेही सोडून गेल्यामुळे या दोन्ही मुलींच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. त्यांच्या भविष्याचा आणि जगण्याचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे.
( नक्की वाचा : English Medium School: इंग्रजी शाळांची लूट थांबणार! अवास्तव फी आणि कमिशनखोरीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक )
संतप्त ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्ता रोको आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आरोपी चालकाला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे अकोला-दर्यापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने येथे गतिरोधक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अवघ्या अर्ध्या तासात आरोपी जेरबंद
अपघाताचे गांभीर्य ओळखून सिव्हिल लाईन पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील तब्बल 30 ते 40 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपास करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेलेल्या एका संशयास्पद ट्रकची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत RJ 11 GB 0492 क्रमांकाचा ट्रक जप्त केला.
या प्रकरणी ट्रक चालक सूरजसिंग रामेदसिंग, वय 30 आणि भगवानदास मारासिंग जाठव, वय 50, दोन्ही राहणार मध्य प्रदेश यांना अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत, मात्र या कारवाईने त्या अनाथ झालेल्या दोन मुलींच्या आयुष्यातील अंधार दूर होणार नाही, अशीच भावना सर्वजण व्यक्त करत आहेत.