योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (PHC) अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अचानक केंद्राला भेट दिल्यानंतर समोर आलेल्या गंभीर त्रुटींमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे. या भेटीनंतर केवळ 2 दिवसांतच जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी जागे झाले असून त्यांनी तातडीने पाहणी करून चौकशी समिती नेमली आहे.
हिवरखेड PHC चे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे, यासाठी हिवरखेड विकास मंच आणि जागरूक नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. आमदार अमोल मिटकरी हे देखील या मागणीसाठी शासनदरबारी आणि विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आमदार मिटकरी यांनी 2 डिसेंबर रोजी हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचा अचानक दौरा केला. या आकस्मिक तपासणीत केंद्रातील कारभाराचे अत्यंत गंभीर चित्र समोर आले.
वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित, रुग्णांशी गैरवर्तन आणि अस्वच्छतेचा कळस
आमदारांच्या दौऱ्यात अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल झामरकर हे वारंवार अनुपस्थित असल्याचे तसेच, तेथील कर्मचारी रुग्णांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, त्यांचा स्वभाव विनम्र नसल्याची सातत्याने नागरिकांकडून येणारी तक्रार आमदारांना समजली. एवढेच नाही तर, संपूर्ण रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता, स्वच्छतेचा बोजवारा, तसेच औषधांचा अपुरा साठा आणि रक्त-मासाचे गोळे दिसल्याने वैद्यकीय सेवांची दुरवस्था स्पष्ट झाली. ही संपूर्ण गंभीर स्थिती आमदार मिटकरी यांनी त्वरित जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
( नक्की वाचा : Akola News : 'पाकिस्तान जिंदाबाद' Video चा पर्दाफाश; चिमुरड्यांच्या घोषणांचं अकोला पोलिसांनी सांगितलं सत्य )
चौकशी समितीची स्थापना
आमदारांनी तक्रार करताच, अकोला जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनिता मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फरहान खान यांनी हिवरखेड PHC ला भेट देऊन स्थितीची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यानही डॉ. अनिल झामरकर हे अनुपस्थित असल्याने प्रशासनाचा रोष आणखी वाढला. तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली.
या समितीमध्ये डॉ. विजय जाधव, डॉ. करंजीकर आणि डॉ. फरहान खान यांचा समावेश आहे. या समितीला तातडीने तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यानुसार तालुका स्तरावर सध्या चौकशी सुरू आहे.
( नक्की वाचा : Akola News : एका चिमुरडीसाठी अख्खे गाव एकवटले; निवडणुकीच्या गोंधळात घडणार होता भयंकर प्रकार! नेमकं काय घडलं? )
आमदारांची कठोर कारवाईची मागणी
आमदार अमोल मिटकरी यांनी या गंभीर स्थितीवर नाराजी व्यक्त करत, "मी हिवरखेड येथे ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील आहे. परंतु, आरोग्य केंद्राची पाहणी केली असता, येथे प्रचंड अस्वच्छता, नियोजनाचा अभाव आणि ढिसाळ कारभार दिसून आला. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. झामरकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
दुसरीकडे, चौकशी समितीचे सदस्य डॉ. फरहान खान यांनी सांगितले की, "आमदारांच्या भेटीनंतर आलेल्या सर्व तक्रारींची आम्ही चौकशी सुरू केली आहे आणि लवकरच या संदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल." आता स्थानिक नागरिक आणि विकास मंच प्रशासनाच्या या चौकशी अहवालाकडे आणि ठोस कारवाईच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.