Success Story: कृषी सेवक ते सहाय्यक आयुक्त.. अकोल्याच्या लेकीची यशस्वी झेप; संघर्षातून मिळवलं यश!

सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी अखेर राज्यसेवा परीक्षेत यश मिळवत सहाय्यक आयुक्त/मुख्याधिकारी पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

जाहिरात
Read Time: 3 mins

योगेश शिरसाट, अकोला:

Akola Success Story:  अकोल्याच्या मुलीने राज्यभरात अकोल्याचं इतिहासाच्या पानात नाव कोरल आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ८ एप्रिल रोजी जाहीर झाला असून अकोल्याच्या प्रगती जगताप यांनी उल्लेखनीय यश मिळवत सहाय्यक आयुक्त/मुख्याधिकारी (गट-अ) या पदासाठी निवड मिळवली आहे. अनुसूचित जातीतील महिलांमध्ये राज्यात अव्वल येत त्यांनी अकोल्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या प्रगती जगताप यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

संकटांवर मात करत पुढे वाटचाल..!

प्रगती जगताप या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २०२० च्या एमपीएससी परीक्षेतून त्यांची या पदावर निवड झाली होती. मात्र, त्यांचे ध्येय यापेक्षा मोठे होते. २०१७ पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी कठोर परिश्रम करत २०१८ मध्ये कृषी सेवक म्हणून नोकरी स्वीकारली.

Advertisement

नोकरी करतानाच अभ्यासाची कास धरत त्यांनी उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न मनात जपले. एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत त्यांनी तब्बल सात वेळा यश मिळवत मुलाखतीपर्यंत मजल मारली. सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी अखेर राज्यसेवा परीक्षेत यश मिळवत सहाय्यक आयुक्त/मुख्याधिकारी पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

यादरम्यान, प्रगती जगताप यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. १३ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे वडील तथा माजी नगरसेवक सुनील जगताप यांचे निधन झाले. हा त्यांच्या आयुष्यातील मोठा धक्का होता. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

प्रगती यांच्या कुटुंबात आई अंगणवाडी सेविका असून भाऊ रोहित असे लहान कुटुंब आहे. प्रगती या घरातील सर्वात मोठ्या असल्याने वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आली. घरातील दुःखद परिस्थितीतही त्यांनी खचून न जाता कुटुंबाला आधार दिला आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू ठेवला. याच काळात त्यांनी राज्यसेवा २०२४ च्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्याच दरम्यान त्यांना कावीळ झाल्याने प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागले. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा उभे राहत परीक्षेची तयारी सुरू ठेवली.

Crime News: भाजीत केस का निघाला? पतीचे अमानुष कृत्य, रात्रभर जे केलं... विवाहितेने आयुष्य संपवलं

प्रेरणादायी 'प्रगती'ची कहाणी!

आरोग्याच्या अडचणींवर मात करत प्रगती जगताप यांनी अखेर एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. अनुसूचित जातीतील महिलांमध्ये राज्यात प्रथम येत त्यांनी सहाय्यक आयुक्त / मुख्याधिकारी या वर्ग-१ पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे अकोल्यासह संपूर्ण राज्यात त्यांच्या नावाची चर्चा होत आहे.

Advertisement

विशेष म्हणजे कृषी सेवक ते सहाय्यक आयुक्त असा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी मानला जात आहे. ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची कहाणी संघर्षातून यश मिळवण्याचे उदाहरण ठरत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना त्यांच्या यशातून नवी प्रेरणा मिळत आहे. दरम्यान, इतके मोठे यश मिळवूनही "प्रगती" यांच्या मनात एक खंत कायम आहे. त्यांच्या या यशाचा आनंद पाहण्यासाठी त्यांचे वडील आज या जगात नाहीत, याची खंत त्या व्यक्त करत आहेत. मात्र, त्यांच्या संघर्ष, जिद्द आणि मेहनतीमुळे प्रगती जगताप या आज राज्यसेवेत उच्च पदावर पोहोचल्या असून अकोल्यासाठी त्या अभिमानाचा विषय ठरल्या आहेत.

Pune Railway News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे स्टेशन